महाराष्ट्रात लवकरच 'राईट टू हेल्थ' कायदा, आरोग्यमंत्र्यांची घोषणा; कार्यक्रमात भाजप आमदारांनाही कानपिचक्या
भाजप पदाधिकारी प्रशांत देशमुख यांनी या कार्यक्रमात भाजपचे आजी माजी आमदार का आले नाहीत याचा जाब प्रशासनाला विचारावा, अशी मागणी करीत कार्यक्रमाचा जाहीर भाषणात निषेध केला

सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याहस्ते आज पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन इमारत भूमिपूजन समारंभ ठेवण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात भाजपच्या आजी माजी आमदारांनी अघोषित बहिष्कार टाकत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तर भाजप (BJP) पदाधिकाऱ्याने कार्यक्रमात भाषण करीत निषेध व्यक्त केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनीही भाजपच्या आजीमाजी आमदारांचे नाव न घेता खडे बोल सुनावले. या कार्यक्रम पत्रिकेत नाव असूनही भाजप आमदार समाधान आवताडे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली नाही, तर माजी आमदार (MLA) प्रशांत परिचारक यांचे नाव नसल्याने त्यांनीही पाठ फिरवली. त्यामुळे, हा भूमिपूजनपेक्षा राजकीय नाराजी नाट्यानेच हा कार्यक्रम जिल्ह्यात चर्चेत राहिला. मात्र, लवकरच राईट टू हेल्थ कायदा आणला जाईल,अशी घोषणाच मंत्री आरोग्य सावंत यांनी केली.
भाजप पदाधिकारी प्रशांत देशमुख यांनी या कार्यक्रमात भाजपचे आजी माजी आमदार का आले नाहीत याचा जाब प्रशासनाला विचारावा, अशी मागणी करीत कार्यक्रमाचा जाहीर भाषणात निषेध केला. त्यानंतर, आरोग्यमंत्री तातडीने बोलण्यास उभारले आणि या कार्यक्रमात कोणाला बोलावयाचे हा जिल्हा प्रशासनाचा प्रश्न आहे, माझ्या आरोग्य विभागाचा नाही असे त्यांनी म्हटले. मात्र, संवैधानिक पदावर असलेले व्यक्ती हे शासनाचे, प्रशासनाचे अंगीकृत भाग असतात, ज्यावेळी लोकार्पण किंवा भूमिपूजन असे जनतेच्या हिताचे कार्यक्रम असतात अशावेळी स्वतःचा मान-अपमान हे सगळे विसरुन जनतेच्या भल्यासाठी जायला पाहिजे, असा टोला सावंत यांनी लगावला. यामध्ये, कोणताही दुजाभाव अथवा पक्षीय राजकारण नसून राज्याच्या साडेबारा कोटी लोकांना आरोग्याची व्यवस्था मिळाली पाहिजे, यासाठी मी काम करीत असल्याचे डॉ. सावंत यांनी म्हटले.
भाजप आमदार निशाणाऱ्यावर
माझ्याकडे ज्या-ज्या वेळी फाईली येतात, त्या कोणत्या पक्षाच्या आहेत त्या बघून काम न करता हा जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे म्हणून काम करतो. अर्धवट माहितीच्या आधारावर लोकार्पण किंवा भूमिपूजनसारख्या लोकांच्या हिताच्या कामला जर कोणी नख लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याचा मी सर्वांच्या साक्षीने निषेध करतो, असे म्हणत कार्यक्रमाकडे पाठ फिरवणाऱ्या भाजप भाजप आमदारांना तानाजी सावंत यांनी चांगलेच फटकारले. दरम्यान, माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रात येत्या काही दिवसात right to helth म्हणजेच 'आरोग्य माझा अधिकार' हा कायदा आणला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे राज्यातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी सरकारची असणार असून याचा मोठा फायदा जनतेला होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. शिंदे सरकारने मोफत उपचार सुरू केल्यानंतर आयपीडीमधील रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने तर ओपीडीमधील रुग्णांच्या संख्येत पाचपट वाढ झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
लवकरच राईट टू हेल्थ कायदा
झोपडपट्टी आणि गोरगरीब दारिद्र्य रेषेखालील जनतेसाठी आपला दवाखाना सुरु करून त्याची वेळ दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत ठेवल्याने त्याचाही लाभ गोरगरीब रुग्णांना मोफत उपचारातून मिळू लागला आहे. आता आरोग्याचा अधिकार कायदा लवकरच, या किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये आणून अधिवेशनात पास केला जाईल, असा विश्वास डॉ तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. त्यामुळे, अनेक रुग्णांना वेळीच मोफत उपचार मिळू शकतील असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.























