(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajesh Tope : महाराष्ट्रात निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, मार्चमध्ये...
राज्यातील कोरोना रूग्णांची (corvis patients) संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे.
Rajesh Tope on Corona : राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर केंद्राच्या सुचनेनंतर निर्बंध शिथिल करण्यावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रातही याच निर्बंधाबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठं वक्तव्य जालन्यात केलं आहे. काय म्हणाले राजेश टोपे?
मार्चमध्ये निर्बंधापासून मुक्ती मिळेल?
कोरोना पार्श्वभूमीवर केंद्राच्या सुचनेनंतर निर्बंध शिथिल करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान राज्यात मार्चमध्ये मास्क मुक्ती होणार नाही, मात्र निर्बंधापासून मुक्ती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत निर्बंध मुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांना देखील विनंती करू असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात पूर्णपणे अनलॉक होण्याचे संकेत टोपे यांनी दिले आहेत. "येत्या मार्च महिन्यात राज्यातील निर्बंध शिथिल केले जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीसुद्धा हीच मनीषा असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.
परीक्षा नव्या पद्धतीने घेण्याची सरकारची भूमिका
आरोग्य विभागाच्या पेपरफुटी नंतर भरती प्रक्रियेसाठी नव्या पद्धतीने परीक्षा घेण्याचा सरकारचा निर्णय असून पोलिसांचा स्पष्ट निर्णय आल्या नंतर त्यावर त्वरित निर्णय घेतला जाणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.पोलिसांचा रिपोर्ट आल्यावरच या संदर्भात निर्णय होणार असे आरोग्यमंत्री म्हणाले. दरम्यान पोलिसांचा अहवाल लवकर यावा यासाठी गृहमंत्री पुणे पोलीस कमिशनर यांना बोलल्याचे देखील आरोग्यमंत्री म्हणालेत.
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. देशातील कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत आहे. गेल्या 24 तासात देशात 16 हजार 51 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 206 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या दिवसाच्या तुलनेत आजची रुग्णसंख्या ही कमी आहे. काल देशभरात 19 हजार 968 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, गेल्या 24 तासात देशात 37 हजार 901 कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 4 कोटी 28 लाख 38 हजार 524 लोकांना लागण झाली आहे. त्यापैकी 5 लाख 12 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 कोटी 21 लाख 24 हजार लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सद्या देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांपेक्षा कमी आहे. सध्या एकूण 2 लाख 2 हजार 131 रुग्णांवर उपचार सुरूच आहेत.
मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूरसह मोठ्या शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात
महाराष्ट्राचा विचार केला तर तिथेही रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्यामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूरसह मोठ्या शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. काही जिल्ह्यात रविवारी एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 1 हजार 437 नवे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी राज्यात एक हजार 635 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरली आहे. कारण मुंबई, पुणे जिल्हा, पुणे मनपा आणि अहमदनगर वगळता कोणत्याही जिल्ह्यात तीन आकडी रुग्णसंख्या नाही.
- Nitesh Rane on Shiv sena : महाराष्ट्राच्या प्रधान सेवकानं जनतेला भेटलेलं आम्हालाही पाहायचंय; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
- राणेंच्या बंगल्यावर कारवाई होणार? पाहणीसाठी पालिकेचं पथक रवाना, अधिकारी काय पाहणी करणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha