Maharashtra Rains Live Updates : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, काही ठिकाणी अतिवृष्टीचा मोठा फटका
मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

Background
Maharashtra Rains Live Updates : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं हजारो हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानं गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून, पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं विदर्भाची चिंता वाढवली आहे. तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
वाशिम पाऊस
वाशिम जिल्ह्यात सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे. सध्या वाशिम जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं दिवसभर पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे आणि 309 गावे प्रभावित
राज्यात एक जून पासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे आणि 309 गावे प्रभावित झाली असून 83 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 110 नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर 218 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 2 हजार 86 घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे.
ओला दुष्काळ जाहीर करावा, अजित पवारांची मागणी
विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले शेतजमीन आणि पिकांचे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. दरम्यान यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही पत्र लिहिले आहे.
जून महिन्याच्या जवळपास 20 तारखेपासून ते आजपर्यंत सातत्याने पाऊस पडत आहे. राज्यातील काही भागांमध्ये मी स्वत: पाहणी केली असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याशी सातत्याने दूरध्वनीद्वारे संपर्कात आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांने केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे अजित पवार यांनी पत्रात म्हटलं आहे. काही ठिकाणी पावसाने जमिनी वाहून गेल्या असून घराचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. स्थावर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पंचनामे अजुनपर्यंत होऊ शकले नाहीत. पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत असताना मोठया प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होण्याचे प्रमाण निदर्शनास आले आहे. यावर तातडीने त्यांना एक दिलासा म्हणून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टींने आणि आत्महत्या होऊ नये याकरिता या दोन्ही विभागांमध्ये आणि राज्याच्या इतर विभागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे.
Aurangabad: जायकवाडी धरणातून आणखी विसर्ग वाढवला
Aurangabad: जायकवाडी धरणातून सुरु असलेला विसर्ग टप्याटप्याने वाढवला जात आहे. कालपासून आतापर्यंत दोन वेळ विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाच्या एकूण 27 दरवाज्यांपैकी 10 ते 27 नंबरच्या एकूण 18 दरवाज्यातून दीड फुट उंचीवरून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे काही वेळापूर्वी पाण्याच्या विसर्गात 9 हजार 432 क्युसेकची वाढ केल्याने या 18 दरवाज्यातून 28 हजार 296 क्युसेकने पाणी विसर्ग सुरु आहे. तर जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेक आणि उजव्या कालव्यातून 550 क्युसेकने पाणी विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सर्व मिळून धरणातून एकुण 29 हजार 885 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरु
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र, आज सकाळपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात भात शेतीची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. शेवटच्या टप्प्यातील भात लागवडीसाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, पाऊस अचानक गेल्याने बळीराजा चिंतेत होता. आता मात्र संततधार पावसामुळे थोडासा दिलासा बळिराजाला मिळत आहे.























