Maharashtra Rain : कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा, खबरदारीचा उपाय म्हणून 15 तुकड्या तैनात
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात 15 एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत
मुंबई : जुलैच्या सुरुवातीपासून राज्याच्या (Maharashtra Rain) विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावलीय. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात 15 एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत
पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता
कोकण विभागामध्ये पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 100.1 मिमी. पाऊस झाला आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्याने आणि भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवीली आहे. पालघर जिल्हा प्रशासन सतर्क असून मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात NDRF ची एक टीम तैनात करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात पूरस्थिती नाही, कशेडी घाट मार्गातील वाहतूक धीम्या गतीने
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 135 मिमी. पाऊस झाला आहे जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सावित्री, कुंडलिका तसेच इतर मोठ्या नद्या धोका पातळीच्या खाली वाहत असून कशेडी घाट मार्गातील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पोलादपूर, महाड व माणगाव येथील दरड प्रवण व पूर प्रवण भागातील 578 कुटुंब म्हणजे एकूण 1716 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात दोन NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात पूर परिस्थिती नाही, परशुराम घाट बंद
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 154.89 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी धोका पातळीवरून वाहत आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी, राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. सदर भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरता बंद करण्यात आला आहे. वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दरड प्रवण व पूर प्रवण भागातील 152 कुटुंब म्हणजे एकूण 479 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात 155 मिमी पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात 155 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरुळीत सुरु आहे. तसेच जिल्ह्यात एका घराचे पूर्णतः तर 14 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात एक NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य
पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही. तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सर्व प्रकारची वाहतुक सुरुळीत सुरु आहे.
कोल्हापुरात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
कोल्हापूर- जिल्ह्यात सद्यस्थिती मध्ये पूर परिस्थिती नाही मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 7 फुटांनी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी 21.7 फुट असून इशारा पटली 39 फुट एवढी आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने झालेली वाढ आणि पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता NDRF च्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नदी काठावरील लोकांना सातत्याने सतर्कतेच्या सूचना देण्यात येत असून स्थानिक शोध व बचाव पथके तैनात करण्यात आली आहे.
अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती. तरी खबरदारीचा उपाय म्हणून गावातील 2102 लोकांना जिल्यातील 7 निवारा केंद्रात हलविण्यात आहे. अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची नोंद नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक शोध व बचाव पथके कार्यरत आहेत.