मान्सून 18 जूनपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार बरसण्याची शक्यता, कोकणातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज
Maharashtra Rain :18 जूननंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain : राज्यभरातल्या जनतेला जोरदार पावसाची प्रतीक्षा असली तरी मान्सूननं (Monsoon) महाराष्ट्र व्यापलाय. हवामान विभागानं तसं जाहीर केलंय. राज्यात पुढचे दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 18 जूननंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सून आज विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांत पोहोचला. राज्यभरात पुढचे दोन- तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात मात्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
राज्यात मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसानं दरदार हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच शेतीकामांना वेग आला आहे.
कुठे कुठे मान्सून दाखल झाला
नागपूरच्या प्रादेशिक हवामान कार्यालयाने यापूर्वी विदर्भात 19 जूनपासून पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, त्या अंदाजाच्या तीन दिवसाआधीच मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानुसार नैऋत्य मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गुजरात राज्य, संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, विदर्भाचा बहुतांश भाग, संपूर्ण तेलंगणा, दक्षिण छत्तीसगडचा काही भाग आणि दक्षिण ओडिशा, बहुतांश भागात पुढे सरकला आहे.