Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी, शेतीच्या कामांना वेग
कालपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी पूरस्थिती होती, त्या ठिकाणच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
LIVE
Background
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळं शेतकरी आनंदी आहेत. तर काही ठिकाणी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसानही झालं आहे. तर काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, कालपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी पूरस्थिती होती, त्या ठिकाणच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पावासाचा जोर कमी झाल्यामुळं शेतीच्या कामांना वेग आला आहे.
नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती
नाशिक जिल्ह्यातील आजही अनेक भागात पूर परिस्थिती जैसे थे आहे. मात्र, अनेक भागात नदीवर पूल नसल्यानं नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील केटी बंधाऱ्यावरुन पुराचे पाणी जात असल्यानं येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून शाळेचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव समोर आले आहे.
बुलढाणा पाऊस
बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसानं धुमकूळ घातला आहे. मात्र, कालपासून काही प्रमाणात पावसाचा जोर कमी आला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापूरकरांना दिलासा
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वरुणराजाने उघडीप दिल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. पावसानं उघडीप दिल्यानं शेतीच्या कामांनाही वेग आल्यानं बळीराजा सुखावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 16 बंधाऱ्यांवर पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. जिल्ह्यातील अजूनही 15 बंधारे पाण्याखाली असले, तरी पाणी वेगाने ओसरत असल्याने ते सुद्धा लवकरच मोकळे होतील, अशी चिन्हे आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये निम्म्य्याहून अधिक पाणीसाठा झाला असला, तरी ती पूर्णत: भरलेली नाही. पाटबंधारे विभागाकडून धरणातून पाण्याचे विसर्ग करण्याचे नियोजन सुयोग्य झाल्याने यंदा अजूनपर्यंत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नाही. पंचगंगा नदी पुन्हा पात्राकडे गेल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट, तर धोका पातळी 43 फुट आहे. मात्र, जुलैच्या पावसाने आजअखेर,पंचगंगेची पातळी इशारा पातळीवर पोहोचलेली नाही.
हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस
हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं औंढा नागनाथ तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच ओढे, नाले, नद्या तुडुंब भरुन वाहत आहेत. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ शहराचा पाणीपुरवठा औंढा नागनाथ तलावावर अवलंबून आहे. याशिवाय वगरवाडी, वगरवाडी तांडा या भागातील शेती देखील याच तलावाच्या सिंचनाखाली येते.
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या आठवडाभरात राज्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला होता. अशातच आता उद्यापासून (23 जुलै) राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं ( Meteorology (Department) दिला आहे. पुढील चार दिवस मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगणं गरजेचं आहे.
जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ, गाळपेर जमिनीतील पिकं पाण्याखाली
राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. दरम्यान, या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होत आहे. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीतही (Jayakwadi Dam Water) मोठी वाढ झाली आहे. या धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं पाण्याच्या फुगवट्यामुळं नगर जिल्ह्यातील गाळपेर जमिनीतील पिकं पाण्याखाली गेली आहेत. याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.