Maharashtra Politics : स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या मार्गावर? रविकांत तुपकर हाच आमचा पक्ष...! राजू शेट्टींवर रोष व्यक्त करत स्वाभिमानीच्या बैठकीतील एकमुखी सूर
Maharashtra Politics : आता, स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रविकांत तुपकर यांनी तातडीने कार्यकर्त्यांची बैठक बोलवली.
Maharashtra Politics : राज्यात शिवसेना (Shiv Sena), त्यानंतर राष्ट्रवादी (NCP) आणि आता स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) फुटीच्या मार्गावर चालली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याचं कारणही तसा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी काल कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील मतभेद चव्हाट्यावर आणलेत. यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रविकांत तुपकर यांनी काल बुलढाण्यात कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती. स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्याकडून त्यांचे नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच रविकांत तुपकर यांनी त्याला दुजोरा दिला आहे. "आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत आहे , माझ्या ऐवजी दुसरे कोणी असतं तर आत्महत्या केली असती" अशा शब्दात तुपकर यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली खंत व्यक्त केली. मला संघटनेतून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आमची आहे. आता महाराष्ट्रभर तरुणांची फौज उभी करणार असून शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पोरांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.
रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले. काल बोलावलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांच्या बद्दल रोष व्यक्त केला तर रविकांत तुपकर हेच आमचे पक्षश्रेष्ठ आहेत असाही बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा सूर होता. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सारखेच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन गटात विभागली जाईल का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
विकांत तुपकर यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले होते. रविकांत तुपकर यांना संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून व राजू शेट्टी यांच्याकडून डावलण्यात येत असून रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसाठी लढत असताना त्यांच्या कार्याची दखल मात्र कुणीही घेत नाही .त्यामुळे रविकांत तुपकर हे व्यथित आहे भविष्यात आम्ही रविकांत तुपकर यांच्या सोबतच राहू व त्यांच्यासाठी राज्यभर फिरून कार्यकर्त्यांची आता मोठी फौज तयार करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
या नेत्यांनी स्वाभिमानीला केलाय रामराम
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अनेक नेते नाराज होऊन संघटना सोडून गेले आहेत. सदाभाऊ खोत, देवेंद्र भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडली आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत रविकांत तुपकर हे सुद्धा नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघड व्यक्त केली आणि राजू शेट्टींवर आपला रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडते की काय..? रविकांत तुपकर हे वेगळा मार्ग निवडतात की काय...? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे..