Shivsena On Governor Koshyari: माफी मागा, नाहीतर स्वत:लाच जोडे मारा; शिवसेनेचा राज्यपालांवर हल्लाबोल
Maharashtra Politics Shivsena: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर शिवसेनेने सडकून टीका केली आहे.
Maharashtra Politics Shivsena: छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील नायक झाले असल्याचे सांगत नवा वाद निर्माण करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शिवसेनेने सडकून टीका केली आहे. शिवसेनेने राज्यपालांच्या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. शिवरायांचा अपमान करणार्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात पोहोचलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतील एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या दया याचिकेची कागदपत्रे दाखवून वादळ ओढवून घेतले तेव्हा महाराष्ट्रातील भाजप व त्यांच्या सोबतचा मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला, त्यातले काही वळू रस्त्यावर उतरले. त्यांनी ‘‘शिवसेना आता काय करणार?’’ असे विचारून राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला. आता हे सर्व जोडे स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर पाय
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माती खाल्ली व छत्रपती शिवरायांचा अपमान केला असल्याचे शिवसेनेने म्हटले. शिवाजी महाराज हे जुनेपुराणे, कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हीरो’ आहेत’’ असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर पाय ठेवला. हे भयंकरच आहे. महाराष्ट्रात वीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा गाजत असतानाच भाजप व मिंधे गटाचा पाय त्यांच्याच राज्यपालांच्या धोतरात अडकून कपाळमोक्ष झाला असल्याचे शिवसेनेने म्हटले.
भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची ‘माफीवीर’ म्हणून टवाळी केली. शिवाजी महाराजांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठविल्याचा भलताच इतिहास उकरून काढला व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केला. वीर सावरकरांचा बचाव करताना त्यांनी शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणून देशातील समस्त शिवराय भक्तांच्या अस्मितेचा पाचोळा करून टाकला असल्याचे त्यांनी म्हटले. वीर सावरकरांच्या निमित्ताने हातात जोडे घेऊन रस्त्यावर उतरणारे भाजपचे शूरवीर व मिंधे गटाचे नरवीर आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत असा सवालही शिवसेनेने केला आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढार्यांनी शिवतीर्थावर येऊन महाराष्ट्राची माफी मागावी व अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावी, तरच त्यांचा स्वाभिमान की काय तो महाराष्ट्राला दिसेल असेही शिवसेना ठाकरे गटाने सुनावले.
कोणत्या जन्माचे पाप महाराष्ट्राच्या बोकांडी
राज्यपालांवर टीका करताना शिवसेनेने म्हटले की, राजभवनात पाय ठेवल्यापासून भारतीय घटना व शिवरायांचे विचार अरबी समुद्रात बुडवले आहेत.शिवाजी महाराजांविषयी चुकीची विधाने करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. ‘‘समर्थ रामदासांशिवाय शिवाजीला विचारतोय कोण?’’ असे एक विधान अलीकडे करून याच राज्यपाल महोदयांनी शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही महाराष्ट्रात संतापाचा स्फोट झाला होता. ‘‘मुंबईतून गुजराती-राजस्थानी निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’’ असे आणखी एक विधान करून मुंबईतील कष्टकरी, स्वाभिमानी मराठी माणसांचा अपमान त्यांनी केला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीतही राज्यपालांनी असेच घाणेरडे विधान करून गोंधळ घातला तेव्हा त्यांना माफी मागावी लागली. आता तर त्यांनी थेट शिवाजी महाराजांची चेष्टा आणि टवाळी करण्याचे धारिष्ट्य दाखवले. महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकारला याच राज्यपालांनी सत्तेवर बसवल्यामुळेच त्यांना हे बळ आले असल्याचे शिवसेनेने म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तोंडातून निषेधाचा साधा ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. शिवरायांचे विचार व मार्गदर्शन कालबाह्य झाले आहे, असे भाजपचे लोक उघडपणे बोलतात व असे बोलणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभतात हे कोणत्या जन्माचे पाप महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले आहे? अशा शब्दातही शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे.
शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचे वैयक्तिक मत आहे, असे सांगतात. हा पळपुटेपणा असल्याची घणाघाती टीका 'सामना'तून करण्यात आली आहे. अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे असे महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत शिवरायांचा अपमान करणार्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल असेही शिवसेनेने म्हटले.