Maharashtra Politics : राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही; राऊतांचे सूचक वक्तव्य
Maharashtra Politics : राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.
Maharashtra Politics : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यास त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी केले. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असून त्यातील काही काहींना भावनिक करून शिवसेनेतून फोडण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरही निशाणा साधला.
संजय राऊत यांनी दिल्लीतील निवसास्थानी पत्रकारांशी संवाद साधला. संविधानाची सीमा ओलांडून सुप्रीम कोर्ट निर्णय देणार नाही असा विश्वास वाटतो. त्यामुळे 16 आमदार अपात्र ठरतील अथवा फुटीर गटाला इतर पक्षात सामिल व्हावे लागेल असे संजय राऊत यांनी म्हटले. दुसऱ्या पक्षात विलीन होण्याबाबत अनेक आमदारांची तयारी नाही. त्यामुळे त्यातील अनेकजण पुन्हा येतील. काही जण संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
राज्याचे मुख्यमंत्री वारंवार दिल्लीत जात आहे. एकाच महिन्यात पाच वेळेस मुख्यमंत्र्यांना दिल्लीत यावं लागतं, त्यामुळे ते त्यांचा मुक्काम दिल्लीत हलवणार आहेत का, असा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात निर्माण झाला असल्याचे राऊत यांनी सांगितले. राज्यात पूर स्थिती गंभीर आहे. दोन लोकांचे कॅबिनेट निर्णय घेत आहे. यातून राज्याला आणि त्यांच्या गटाला काय मिळतंय हा संशोधनाचा मुद्दा असल्याचा टोला राऊत यांनी लगावला.
भाजपला शिवसेना फोडायची होती
भाजपला शिवसेना फोडायची होती, मराठी माणसाला दुबळं करायचे होते. हे त्यांना तात्कालीक यश मिळाले असले तरी फार काळ फायदा होणार नाही असेही राऊत यांनी म्हटले. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट युती करणार आहे. त्याबाबत बोलताना राऊत यांनी सांगितले की हा त्या दोन पक्षांचा निर्णय आहे. शिवसेना स्वतंत्र लढेल की मविआमध्ये लढेल हे चर्चा करून ठरवू असेही त्यांनी सांगितले.
हा त्यांच्या मनाचा कद्रूपणा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख पक्षप्रमुख म्हणून करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळले. त्यावरही राऊत यांनी टीका केली. पक्षप्रमुख म्हणून उल्लेख न करणे हा त्यांच्या मनाचा कद्रूपणा असल्याचे राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. शिवसेनेचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांचा पक्षप्रमुख म्हणून उल्लेख न करणे यातच तुमच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेला द्वेष दिसून येत असल्याचे राऊत यांनी म्हटले. तुमच्या मनात उद्धव यांच्याबद्दल द्वेष असला तरी राज्यातील जनतेमध्ये, शिवसैनिकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे दिसून आले असल्याचेही राऊत यांनी सांगितले.