शिवसेनेशिवाय कोणत्याही गटाचे निवेदन माझ्याकडे आले नाही: राहुल नार्वेकर
Maharashtra politics : माझ्याकडे असलेल्या नोंदीनुसार शिवसेना विधिमंडळ गट हा एकच आहे. त्यामुळे त्या एका गटाचा एकच विधीमंडळ गटनेता आहे.
Rahul Narwekar : माझ्याकडे शिवसेनेशिवाय वेगळा गट असल्याचे कुठलेही निवेदन आलेलं नाही. माझ्याकडे असलेल्या नोंदीनुसार शिवसेना विधिमंडळ गट हा एकच आहे. त्यामुळे त्या एका गटाचा एकच विधीमंडळ गटनेता आहे आणि एकच मुख्य प्रतोद आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. ठाकरे गटाच्या व्हीपसंदर्भातील प्रश्नावर ते बोलत होते.
सत्तासंघर्ष आणि शिवसेना-धनुष्यबाणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितलेलं की आपल्या संविधानाच्या तरतुदी आहेत आणि ते नियम आहेत. आजपर्यंतच्या ज्या प्रथा परंपरा आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे पण आदेश आहेत, त्यावरुन स्पष्ट आहे की आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय हा फक्त आणि फक्त विधानसभा अध्यक्षच घेऊ शकतील. जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष या संदर्भातील निर्णय घेत नाही, तोपर्यंत इतर कुठल्याही यंत्रणेला हस्तक्षेप करता येत नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतल्यावर जर तो घटनाबाह्य असेल किंवा नियमबाह्य असेल तर या संदर्भातील दखल उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात मागू शकता. निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलेही कोर्ट यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही, असे मला वाटते आणि तशीच भूमिका आज न्यायालयातही घेण्यात आली. संविधानातील तरतुदींचा आदर करणे हे क्रमप्राप्त आहे, असेही नार्वेकर म्हणाले.
माझ्यापर्यंत न्यायालयाचे कुठलेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. विधिमंडळातील आतलं कामकाज कसं चालवावं? हा पूर्ण निर्णय आणि अधिकार हा पिठासीन अधिकाऱ्याला असतो. यामध्ये कोणी हस्तक्षेप करणार नाही असे मला वाटते, असे नार्वेकर म्हणाले.
संविधानात व्हीप संदर्भात किंवा अपात्रतेसंदर्भात तरतुदी अत्यंत स्पष्ट आहेत. सूची 10 मध्ये दिलेल्या माहितीनुसार विधिमंडळ गटातील निर्णय आणि विधिमंडळ गटातील सदस्यांनी कशाप्रकारे मतदान करावं हे व्हीपद्वारे सांगितलं जातं. जर विधिमंडळ प्रतोदने मतदान करण्यासंदर्भात व्हीप दिला असेल, तर त्याची अंमलबजावणी होणं किंवा उल्लंघन होऊ नये, हे संसदीय लोकशाहीसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे नियमानुसार त्यावर कार्यवाही होईल, असे नार्वेकर म्हणाले.
गरज पडल्यास व्हीप जारी करू - संजय शिरसाट
व्हीप लागू करण्याबाबत कुठलीही बंधनं नाहीत. एकदा व्हीप लागू केल्यानंतर कारवाई कधी करायची हा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. त्यामुळे व्हीप काढणं आणि कारवाई कधी करायची हे प्रतोद आणि अध्यक्ष ठरवतील. दोन आठवडे कारवाई होणार नाही पण आम्हाला गरज पडल्यास आम्ही येणाऱ्या अधिवेशनात व्हीप जारी करू. आम्ही न संपत्ती न मालमत्ता यावर कधीही हक्क सांगणार नाही. शिवसेना भवन हे बाळासाहेबांनी उभारलेले मंदिर आहे, त्यावर आम्ही अधिकार सांगणार नाही.. हे स्पष्ट सांगूनही या अकाउंटमधून पैसे त्या अकाउंटमध्ये हलवले, असे संजय शिरसाट म्हणाले.