Bhagat Singh Koshyari : मविआच्या सत्तास्थापनेची 'वरात आली पण नवरदेव नव्हते'; सरकार स्थापनेच्या घोळावर कोश्यारी यांचा गौप्यस्फोट
Bhagat Singh Koshyari : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना उशीर का झाला, याबद्दलचा गौप्यस्फोट माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे.
Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून निवृत्त झाल्यानंतर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गौप्यस्फोटही केले आहेत. महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन होताना राज्यपालांकडून उशीर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, हा उशीर आपल्यामुळे झाला नसल्याचा दावा कोश्यारी यांनी केला. मविआकडून सत्ता स्थापनेची वरात आली पण त्यात नवरदेवच नव्हता, असा टोलाच त्यांनी लगावला. कोश्यारी यांच्या मुलाखतीनंतर राजकीय वातावरण आता आणखीच तापणार असल्याची शक्यता आहे.
'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेबाबत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे तीन दिवस माझ्या संपर्कात होते. आदित्य ठाकरे पहिल्यांदा भेटायला आले तेव्हा त्यांच्याकडे पाठिंबा असल्याचे पत्र नव्हते. त्यावेळी मी त्यांना पाठिंब्याचे पत्र आणण्याबाबत सांगितले. त्यानंतर दोन दिवस ते संपर्कात होते. मात्र, त्यांना पाठिंब्याचे पत्र मिळाले नाही. मला आदित्य यांच्याबद्दल वाईट वाटत होते. आदित्य हे माझ्या मुलासारखे आहेत. त्यावेळी सगळा खेळ खेळणारे इतर होते, असे त्यांनी म्हटले.
सत्ता स्थापनेची वरात आली पण नवरदेवच नाही
महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा दावा करणारे पत्र घेऊन माझ्याकडे आदित्य ठाकरे आणि इतर नेते आले. सरकार स्थापनेबाबत पाठिंबा असणारे पत्र होते. मात्र, या सत्ता स्थापनेच्या वरातीमधून नवरदेवच गायब होता. ज्याच्या नेतृत्वात सरकार स्थापन करायचे आहे, तीच व्यक्ती अनुपस्थित होती. त्या व्यक्तीचे पत्रदेखील नव्हते असा गौप्यस्फोट कोश्यारी यांनी केला. ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, तीच व्यक्ती आली नव्हती. स्वत: ला राज्यपालांपेक्षा मोठी व्यक्ती समजते का, असा प्रश्न कोणीच उपस्थित का केला नाही, असा प्रश्नही कोश्यारी यांनी मुलाखती दरम्यान उपस्थित केला. अखेर चार तासानंतर शरद पवार यांनी फोन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे पत्र आले असल्याचे कोश्यारी यांनी म्हटले.
राज्याच्या अनेक जिल्ह्यांत फिरणारा राज्यपाल
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले की, आतापर्यंत राज्यपालपदी असलेल्या व्यक्तींपैकी कदाचित मीच पहिला राज्यपाल असेल ज्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. जिजाऊंचे जन्मस्थळ असणाऱ्या सिंदखेडराजालादेखील भेट देणारा मीच पहिला राज्यपाल असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कारकिर्दीत मी अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या, तेथील काही गोष्टी समजून घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले. लोकं कोविडचे कारण देऊन घराबाहेर पडत नव्हते. त्यावेळी मी शिवनेरी किल्ल्याला भेट दिली होती, मला कोविड झाला नव्हता, असेही कोश्यारी यांनी म्हटले.
ते काम जनतेचे, राज्यपालांचे नाही
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी असताना, राज्यातील महाविकास आघाडीबाबत, घडामोडींबाबत आपले आकलन काय होते, असा प्रश्न विचारला असता कोश्यारी यांनी म्हटले की, राज्यातील सरकारचे, राजकीय घडामोडींचे आकलन करण्याचे काम राज्यातील जनतेचे आहे. राज्यपालांचे ते काम नसल्याचेही कोश्यारी यांनी स्पष्ट केले.