(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता? ठाकरे गट आणि काँग्रेसचा प्लॅन बी तयार : सूत्र
Maharashtra Politics : शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर त्यांच्याशिवाय निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र : येत्या काळामध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) आपली भूमिका स्पष्ट नाही केली तर ठाकरे गट (Thanckeray Group) आणि काँग्रेस (Congress) शरद पवारांशिवाय आगामी निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी बंड केल्यानंतरही शरद पवार यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. अजित पवार (Ajit Pawar) हे वारंवार शरद पवारांच्या भेटीली देखील जात आहेत. त्यामुळे आता शरद पवारांच्या भूमिकेवर आगामी निवडणुकांची सूत्र फिरणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर महाविकासआघाडीमध्ये बिघाड होणार असल्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात
आगामी निवडणुकांच्या समीकरणांबाबत दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. नाना पटोले यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचवेळी शरद पवारांच्या भूमिकेबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या बैठकीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाने प्लॅन बी तयार केला असल्याचं सांगितलं जात आहे. तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसने स्वबळावर लढवावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी 'माझा'ला दिली आहे. तसेच देशात इंडिया आणि राज्यात महाविकास आघाडी जरी असली तरी काँग्रेस स्वबळावर सर्व लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचं देखील कुणाल पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली असून आता शरद पवार यांनी त्यांची भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करण्याची मागणी देखील आता दोन्ही मित्रपक्षांकडून करण्यात येत आहे.
ठाकरे गटाकडून आढावा बैठका घेण्यात येणार
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडूनही तयारी सुरु करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे हे लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेणार आहेत. ठाकरे गटाकडून आता निहाय बैठकांचं सत्र सुरु होणार आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून आपल्या पक्षासाठी तयारी सुरु करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.