Maharashtra Politics Ajit Pawar : शिंदेंच्या बंडावेळी ज्या चुका केल्या, त्या आता भाजपनं टाळल्या? राजकीय विश्लेषक सांगतात?
अजित पवार यांनी आज बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे मातब्बर नेते सोबत घेत ते भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत.
Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला. अजित पवार यांच्यासह 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घडामोडीने राज्याच्या राजकारणात खबळब उडाली. बरोबर एक वर्षापूर्वी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी, गोवा प्रवास करत 40 आमदारांना घेऊन शिवसेना फोडली होती आता अजित पवारांनी मातब्बर नेते घेऊन राष्ट्रवादी फोडली. मात्र यावेळी भाजपने अजित पवारांसोबत सरकार स्थापन करताना सखोल विचार केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्यावेळी भाजपने ज्या चुका केल्या त्या चुका भाजपने अजित पवारांसोबत सरकार स्थापन करताना टाळल्या असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
नेतृत्व बदलामुळे बंड?
अजित पवार यांचा 2019 चा पहाटेचा शपथविधी चांगलाच गाजला. त्यावेळीदेखील त्यांनी बंडाचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भाजपची अजित पवारांना अॅलर्जी नसल्याचं त्यांनी आधींच स्पष्ट केलं होतं. त्यात आज झालेल्या बंडातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मागील काही दिवसांपूर्वी नेतृत्व बदल झाला आणि उत्तराधिकारी म्हणून शरद पवारांनी ज्यांना जबाबदारी दिली होती. त्याविरुद्ध जाऊन पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी हा वेगळा निर्णय घेतलेला दिसत आहे. हा निर्णय फक्त नेतृत्व बदलामुळे झाल्याची शक्यता असल्याचं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात.
'प्रतोद, पक्षाचे उपाध्यक्ष सोबत घेत बंड'
एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी आणि त्यांच्यासोबत सरकार स्थापन करताना ज्या चुका झाल्या होत्या. त्याचुका यंदा भाजपने टाळलेल्या दिसत आहे. अजित पवारांसोबत सरकार स्थापन करत असताना पक्षाचे प्रतोद, पक्षाचे उपाध्यक्ष, विधानसभेचे उपाध्यक्ष त्यासोबतच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्षदेखील आज अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे फक्त विधीमंडळ पक्ष बाजूला झाला आहे असं नाही तर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्षदेखील आपल्या सोबत असल्याची समज सुरुवातीपासून तयार करण्यात अजित पवार आणि भाजपला यश आलं आहे.
राष्ट्रवादी फुटली?
अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल सामील झाले आहेत. त्यासोबतच अनेक मातब्बर नेतेदेखील अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये सामील झाले त्यातील काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथदेखील घेतली आहे. या सगळ्या राजकीय नाट्यात मात्र जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यत्र जयंत पाटील सामील नाही आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फुट पडली हे स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा:
Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री, अदिती तटकरेंनी शपथ घेतली