Maharashtra Politics Congress: राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे येणार; राष्ट्रवादीतील बंडाळीचा होणार फायदा
Maharashtra Politics Congress: राज्याच्या विधान सभेत काँग्रेस हा मोठा विरोधी पक्ष ठरला असून त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद येणार आहे.
Maharashtra Politics Congress: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडाळीमुळे राज्याचे विरोधी पक्षनेते पद आता काँग्रेसला (Congress) मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 40 आमदार आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेस हा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. त्यामुळे आता काँग्रेस या पदासाठी कोणाला संधी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मागील वर्षी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार गेले. तर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत 16 आमदार राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज झालेल्या बंडामुळे शरद पवार यांच्यासोबत 15 आमदार असल्याची चर्चा आहे. तर, काँग्रेसकडे 45 आमदार आहेत. त्यामुळे विरोधी बाकांवर आता काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून कोणती नावे चर्चेत?
काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदासाठी आता काही नावांची चर्चा सुरू झाली आहे. सध्या काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आहेत. त्यामुळे त्यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. तर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नावेदेखील चर्चेत आहेत. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागले आहे.
सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीच्या मुद्यांवरून काँग्रेसमधील मतभेददेखील समोर आले होते. तांबे यांच्या उमेदवारीच्या मुद्याकडे काँग्रेस नेतृत्त्वाने दुर्लक्ष केल्यास त्यांना विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष असताना थोरात यांनी काँग्रेसचे संख्याबळ राखण्यास यश मिळवले होते.
अशोक चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, मागील काही महिन्यांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासमत ठरावाच्या वेळी त्यांच्यासह काँग्रेसच्या काही आमदारांना उशीर झाल्याने सभागृहात प्रवेश मिळाला नव्हता.
तर, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सातत्याने भाजपवर टीका केली आहे. भाजपविरोधात त्यांनी आक्रमकता दाखवली आहे. तर, राहुल गांधी यांचे नाना पटोले हे जवळचे नेते समजले जातात. मात्र, त्यांच्या नेतृत्वावर काँग्रेसमधून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून त्यांना हटवण्यासाठी दिल्लीत अनेक नेत्यांनी वरिष्ठांची चर्चा केली होती.
विधानसभेत कोणाचे किती संख्याबळ
सत्ताधारी पक्ष
भाजप 105
शिवसेना (शिंदे) 40
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 37 (अंदाजे)
प्रहार जनशक्ती 02
राष्ट्रीय समाज पक्ष 01
जनसुराज्य पक्ष 01
अपक्ष 12
विरोधी पक्ष
काँग्रेस 45
राष्ट्रवादी (शरद पवार) 16 अंदाजे
शिवसेना ठाकरे 17
समाजवादी पक्ष 02
मार्क्सवादी कम्युनिस्ट 01
शेकाप 01
स्वाभिमानी पक्ष 01
अपक्ष 01
इतर
बहुजन विकास आघाडी 03
एमआयएम 02