MNS : औरंगाबादमध्ये जमावबंदी, शरद पवारांची सभा होणार का? 1 मेच्या सभेसाठी प्रतीक्षेत असलेल्या मनसेचा सवाल
Aurangabad Sharad Pawar Sabha : औरंगाबाद शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. अशातच आज शरद पवार हे देखील औरंगाबादमध्ये उपस्थित असून त्यांची सभा होणार का? असा सवाल मनसेकडून विचारण्यात येत आहे.
Aurangabad Sharad Pawar Sabha : मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या अजेंड्यावर ठाम भूमिका घेतल्यानंतर मनसे पुन्हा एकदा चर्चेत आहे. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिलेला असून, 1 मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा होणार आहे. मात्र, राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. कारण औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे देखील औरंगाबादमध्ये उपस्थित असून त्यांची सभा होणार का? असा सवाल मनसेकडून विचारण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधी सोबत बातचीत केलीय. आणखी काय म्हणाले देशपांडे?
मनसे सभेच्या परवानगीच्या प्रतीक्षेत, शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार?
राज ठाकरेंच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेत मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष भाजपात प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे सभेपूर्वीच औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे देखील औरंगाबादमध्ये उपस्थित असून शहरात त्यांच्या उपस्थितीत काही कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन (मुप्टा) चे सहावे रौप्य महोत्सवी अधिवेशन आज औरंगाबादच्या तापडिया मैदानावर दुपारी होत असून खासदार पवार, मंत्री अजित पवार, राजेश टोपे, धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी खासदार फौजिया खान, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमरसिंह पंडित उपस्थित राहणार आहेत. अशातच औरंगाबादमध्ये जमावबंदी असताना शरद पवारांची सभा होणार का? असा सवाल 1 मे रोजी सभेसाठी प्रतीक्षेत असलेल्या मनसेकडून ठाकरे सरकारला विचारण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश, मनसेच्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या इशाऱ्याचाही उल्लेख
औरंगाबादेत आजपासून 9 मे पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला परवानगी मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. औरंगाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं असून उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे. विविध सणवार, संभाव्य आंदोलनाची कारणं देत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद शहरात आजपासून 09 मे 2022 पर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई होणार आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचे आदेश काढले आहे. या आदेशान्वये पाचपेक्षा अधिक लोक विनापरवाना एकत्र जमू शकत नाही. रमजान ईद ,महापुरुषांच्या जयंती आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर काढले जमावबंदीचे आदेश काढल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पोलिसांनी जमावबंदीचे आदेश काढताना वेगवेगळे सणवार, महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी यांचा उल्लेख केला आहे. तसंच राज ठाकरेंनी मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासंदर्भात दिलेल्या इशाऱ्याची संदर्भ दिला आहे.
राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसे परवानगीच्या प्रतीक्षेत
देशपांडे म्हणाले, मनसे 1 मे रोजी औरंगाबादेत होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेसाठी परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र प्रतीक्षेपूर्वी त्यांच्या हातात पोलीस आयुक्तांच्या जमावबंदीचे आदेशाचं पत्र पडलं आहे, या आदेशानुसार, पोलिसांच्या परवानगीशिवाय पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आलं आहे. जमावबंदीच्या आदेशात मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या इशाऱ्याचाही उल्लेख करण्यात आलाय. तसेच सणवार, संभाव्य आंदोलनाची कारणं देत हे जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
..तरीही मनसे पदाधिकाऱ्यांकडून स्टेज उभारण्याची तयारी
राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी मनसे पदाधिकाऱ्यांनी स्टेज उभारण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे औरंगाबाद पोलीस आयुक्तांची राज्याच्या गृहमंत्र्यांसोबत सोमवारी (25 एप्रिल) झालेल्या बैठकीमध्ये परवानगीबाबत विचारणा केल्याचं समजतं. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का या प्रश्नाच्या उत्तराबद्दल पोलिसांनी अजूनही सस्पेन्स ठेवला आहे. राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी पोलिसांनी परवानगी देण्याबाबत अजूनही मौन बाळगलं आहे. अर्ज करुन सहा ते सात दिवस झाले असले तरी पोलिसांनी परवानगीबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे मनसे पदाधिकारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेण्यावर ठाम आहेत. त्यांनी स्टेजची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :