Shiv Sena Symbol: राज ठाकरेंनाही 'या' निर्णयाचा दुःख झालं असेल; प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया
Shiv Sena Symbol: या सगळ्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
MNS Prakash Mahajan : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज ठाकरेंनाही (Raj Thackeray) दु:ख झालं असेल, असं वक्तव्य मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केलंय. या सगळ्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शनिवारी मोठा निर्णय घेत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Electon Symbol) गोठवलं. त्याशिवाय शिवसेना हे नाव वापरण्यास ठाकरे गट आणि शिंदे गटाला अंतरीम मनाई केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना नेते, शिवसैनिकांमध्ये प्रतिक्रिया उमटू लागली. त्याचे पडसाद सोशल मीडियावरही दिसले.
मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना नाव गोठवल्यानंतर मनसेने उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. प्रकाश महाजन म्हणाले, निवडणुक आयोगाचा हा निर्णय तांत्रिकदृष्ट्या जरी बरोबर असला, तरी एखाद्या पक्षावर ही वेळ येणं अत्यंत दु:खदायक आहे. याचं कुठेही भांडवल करणं हा ना माझ्या नेत्याचा स्वभाव आहे, ना माझ्या पक्षाचा, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटना कोणामुळे झाली, का झाली? हा चर्चेचा विषय होऊ शकतो. परंतु एखाद्या पक्षावर अशी नामुष्की येणं अत्यंत दु:खद आहे.
या सगळ्याला जबाबदार उद्धव ठाकरे - प्रकाश महाजन
महाजन पुढे म्हणाले, झालेल्या सर्व गोष्टीला एकनाथ शिंदेंना कमी जबाबदार मानेन, कारण पक्षप्रमुख त्यावेळेस उद्धव ठाकरे होते. आणि उद्धव ठाकरेंची एक सवय आहे. ते स्व:तवर निष्पाप बुद्धीचा बुरखा पांघरतात. आणि अशा काही प्रचार करतात, जणू काही ते निष्पाप आहेत. दसऱ्या मेळाव्याला जेव्हा उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपदासाठी विधान केलं, ते अत्यंत खेदजनक होतं. छत्रपती शिवाजी महाराज, आई-वडिलांची शपथ घेतली, मात्र राजकारण अशा शपथा घ्यायच्या नसतात, अशी टीका महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
राज ठाकरेंना सर्वात जास्त दु:ख
महाजन म्हणाले, राज ठाकरेंना निश्चितच दु:ख झालं असेल, ते शेरदील आदमी आहेत. उमदा माणूस आहे. राजकारण हे राजकारणाप्रमाणेच खेळतात. राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा त्यांना कित्येक आमदार-खासदार त्यांना भेटायला गेले असतील, पण त्यांनी तेव्हा कोणालाही या म्हणून सांगितले नाही. फक्त त्यांचे एकमेव बाळा नांदगावकर एकमेव मित्र होते. राज ठाकरेंनी कधीही धनुष्यबाणावर आपला अधिकार सांगितला नाही.
जिंकून दाखवणारच - उद्धव ठाकरे
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत जिंकून दाखवणारच असे म्हटले आहे. इन्स्टाग्रामवर केलेल्या या पोस्टला शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. पुढील संघर्षासाठी आम्ही तयार असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले आहे. शिवसेना ही संघर्षातून तयार झाली असून आतदेखील संघर्षातून ती पुढे जाणार असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले.