Sanjay Raut : औरंगजेबाच्या कबरीपुढे माथा टेकणाऱ्यांनो, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल
Sanjay Raut : औरंगजेबाला ही महाराष्ट्राच्या याच मातीत गाडलं होतं, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल हे लक्षात ठेवा. संजय राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut : एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन औवेसी (Akbaruddin Owaisi) हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून त्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं. औरंगाजेबच्या कबरीवर एमआयएमच्या नेत्यांनी माथी टेकवल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी अकबरुद्दीन औवेसींवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, तसेच काश्मिरी पंडितांची सुरक्षितता धोक्यात असून पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजकारण सोडून याप्रकरणी लक्ष द्यावे असं राऊत आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आणखी काय म्हणाले संजय राऊत?
....तर तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल
औरंगजेबाच्या कबरीपुढे माथा टेकणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही, वारंवार औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकवत महाराष्ट्रात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न ओवेसींकडून होतोय. औरंगजेबाने आमची मंदिरं उध्वस्त केली, औरंगजेबाला ही महाराष्ट्राच्या याच मातीत गाडलं होतं, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल हे लक्षात ठेवा. ज्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं, त्यांनाही याच मातीत गाडू, त्यामुळे महाराष्ट्राला आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल तर आम्ही ते आव्हान स्वीकारायला तयार आहे असं संजय राऊत म्हणाले.
काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल
काश्मिरी पंडितांची घरवापसी हा भारतीय जनता पक्षाचा मुख्य अजेंडा होता, काश्मिरी पंडितांच्या सोयी-सुविधा, त्यांच्या सुरक्षेसाठी 370 कलम हटविण्यात आले. याला शिवसेनेचा पाठिंबा राहिलेला आहे. तरीही या पंडितांची घरवापसी होऊ शकली नाही, त्यांच्यासोबत सामान्य रहिवाशीही आजही असुरक्षितच आहे, त्यामुळे हनुमान चालिसा, लाऊडस्पीकर असे विषय मुद्दाम बाहेर काढून जनतेचं मन जिंकता येत नाही
मोदी आणि अमित शाहांनी गांभीर्याने दखल देण्याची आवश्यकता
संजय राऊत पुढे म्हणाले, काश्मिरमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय. सातत्याने काश्मिरी पंडितांच्या हत्या होत असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे. शिवसेना संवेदनशीलपणे या विषयाकडे पाहतोय, पण केंद्र सरकार काय करतेय? या प्रकरणी पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी गांभीर्याने दखल देण्याची आवश्यकता आहे या दोघांनी केंद्रीय राजकारण बाजूला ठेवून लक्ष दिलं पाहिजे.
राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया
इम्तियाज जलील - खुल्ताबादमध्ये गेल्यानंतर सर्वजण औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतात असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यावरुन कोणताही वाद निर्माण करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठीच एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन औवेसी यांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन सर्व दर्ग्यांचं दर्शन घेतल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
चंद्रकांत खैरे - शिवसेनेच्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, "औरंगजेबने इथल्या नागरिकांवर जिझिया कर लावला. हिंदू मंदिरं पाडली, लोकांना त्रास दिला. हिंदू धर्म नष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न केला. खुल्ताबादमधील इतर दर्ग्यांमध्ये लोक जातात, पण त्या ठिकाणच्या औरंगजेबच्या कबरीचं दर्शन कोणीही घेत नाही. आज एमआयएम वाल्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं. यामधून काहीतरी नवीन राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे."
वारिस पठाण - एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, अकबरुद्दीन औवेसी हे आज एका शाळेची स्थापना करण्यासाठी आले आहेत. त्यासाठी आज आम्ही सर्व दर्ग्यांचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. यामध्ये कोणतंही राजकारण नाही.एका कबरीचं दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या कबरीकडे दुर्लक्ष करणे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही सर्वच कबरींचं दर्शन घेतलं.