Navneet Rana : "महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट 'उद्धव ठाकरे', संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण" नवनीत राणांचा निशाणा
Navneet Rana : यावेळी दिल्लीत राणा समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं, यावेळी समर्थकांच्या 'जय श्रीराम' च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
Navneet Rana In Delhi : "महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट म्हणजे उद्धव ठाकरे असून महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण करण्यात येत असल्याचं अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय. दरम्यान, नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण करण्यासाठी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे पोहचले आहेत. राणा दाम्पत्यानी दिल्लीत हनुमान चालिसा पठण केले, यावेळी दिल्लीत राणा समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं, यावेळी समर्थकांनी 'जय श्रीराम' च्या घोषणाही लगावल्या.
दिल्लीत राणा समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित, 'जय श्रीराम' च्या घोषणा
हनुमान चालिसा पठण तसेच महाआरती करण्यासाठी राणा दाम्पत्य आज सकाळी 9.30 वाजेदरम्यान दिल्ली येथील त्यांच्या घरापासून पायी हनुमान मंदिरात पोहचले, जे त्यांच्या घरापासून सुमारे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारपासून सुटका करण्यासाठी हनुमान चालीसा पाठ करतील, असे राणा म्हणाले होते. यावेळी भगवे झेंडे घेऊन समर्थकांसह राणा यांनी पदयात्रा करत ते हनुमान मंदिरात पोहचले
मी घाबरणार नाही - नवनीत राणा
मी घाबरणार नाही, थकणार नाही. महिलांना घाबरवून जेलमध्ये डांबणं हे मान्य नाही तसेच इतकी कमजोर देशातील स्त्री मुळीच नाही, महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट म्हणजे उद्धव ठाकरे असून महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे. असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
राणा दाम्पत्याला 23 एप्रिल रोजी मुंबईत अटक करण्यात आली होती
दरम्यान, राणा दाम्पत्य आता दिल्लीत पोहोचले असून आज हनुमान चालीसा पाठ करणार आहे. सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता.
तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यानं जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या. सरकारकडून राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला जात होता. अखेर त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.