Jitendra Awhad : ...तर 75 टक्के समाज डॉ बाबासाहेब आंबेडकरांसोबत गेला असता, आणखी काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
यावेळी आव्हाडांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा समाचार ही घेतला. तसेच बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेल्या इतिहासावर पुन्हा आक्षेप नोंदवले.
Jitendra Awhad : ओबीसी समाजाला तेंव्हा आरक्षण मिळालं असतं तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांसोबत 75 टक्के समाज गेला असता. असं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांती जोतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. इथं आपलं मनोगत व्यक्त करताना आव्हाडांनी हे वक्तव्य केलं. यावेळी आव्हाडांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा समाचार ही घेतला. तसेच बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेल्या इतिहासावर पुन्हा आक्षेप नोंदवले. आजकालची द्वेषभावना ही नथुराम गोडसेंपासून फोफावत आल्याचं ही त्यांनी नमूद केलं.
बाबासाहेब आंबेडकर किंवा त्यांच्या कार्याचा उल्लेख राज ठाकरेंनी का केला नाही?
राज ठाकरेंनी मंगळवारी केलेल्या भाषणात भोंग्यांवरुन टीका करणाऱ्या मविआ नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलनं समाचार घेतला. त्यावर काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हांडांनी देखील राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आव्हाड म्हणाले, आंबेडकर जयंतीच्या काही दिवस आधी राज ठाकरेंचा मेळावा झाला होता. आंबेडकर किंवा त्यांच्या कार्याचा उल्लेख का केला नाही. आव्हाड यांनी मुंब्य्रातील दहशतवादी संबंधांबद्दलच्या टिप्पण्यांचा संदर्भ देत दहशतवाद जगात कुठेही होऊ शकतो. ते साध्वी यांच्याबद्दल का बोलत नाही? मनसे कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या अशांततेमुळे ठाकरे यांनी सभा घेतली.
राज ठाकरेंनी बहुजन समाजाचा इतिहास वाचलाच नाही
राज ठाकरे यांनी कधी बहुजन समाजाचा इतिहास वाचलाच नाही. हे नेहमी पुरंदरेंचा इतिहास वाचत गेले, ज्या पुरंदरेंनी जेम्स लेनला माहिती देऊन आमच्या जिजाऊंची बदनामी केली ते ह्यांचे आदर्श असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र खूप मोठ्या मनाचा आहे.
आव्हाड काल म्हणाले, राज ठाकरे हे त्यांच्या वक्तव्यातून जातीय तेढ निर्माण करतात हे महाराष्ट्राला माहीत आहे. महाराष्ट्र खूप मोठ्या मनाचा आहे. तुम्हाला फुलासारखं बाहेर काढलं. काल घरातून बाहेर पडल्यापासून ठाणे पर्यंत पोहचेपर्यंत तुम्हाला फुलासारखं आणले. ठाणेकरांच्या गाड्या अडवण्यात आल्या. ठाण्यात ट्राफिक जाम होतं. पण खबरदारीची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र सरकारने सुरक्षा व्यवस्था दिली. एवढी सुरक्षाव्यवस्था शरद पवार, मुख्यमंत्र्यांनाही दिलेली पाहिली नाही. काल ठाण्यातील ट्राफिक कमी करण्यासाठी चार तास लागले याविषयी बोलणार नाही, कारण तुम्ही महान आहात असा टोलाही लगावला. हा महाराष्ट्र सरकारचा मोठेपणा आहे मात्र त्यांची टिंगल राज ठाकरे करतात असे ते म्हणाले.