(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक वादळी ठरणार; औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव येण्याची शक्यता
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. गेल्या 24 तासातील ही दुसरी बैठक आहे.
Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळची आजची बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून तीन नामांतराचे प्रस्ताव आणण्याची तयारी आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रालयात आज संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ठाकरे सरकारची आज अखेरची मंत्रिमंडळ बैठक असणाऱ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आजच्या मंत्रीमंडळात कोणते निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. मंगळवारी देखील कॅबिनेटची बैठक झाली. 24 तासात राज्य मंत्रिमंडळाची दुसरी बैठक आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे या बैठकीसाठी मंत्रालयात दाखल झाले आहे.
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते. मात्र, शिवसेनेचा एकही प्रतिनिधी सहभागी झाला नाही. . औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे अनिल परब यांनी मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मांडला होता. त्याच प्रस्तावावर आज सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. काँग्रेसकडून शिवसेनेनं घेतलेल्या नामकरणाच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. आज संध्याकाळी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव आल्यास काँग्रेसकडून प्रस्तावाला विरोध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सत्ता बदलाची चाहूल सर्वात आधी प्रशासनाला लागते असं म्हणतात. मंत्रालयाला दोन दिवसात तशी जाणीव झाल्याचं दिसतं. मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसात 250 जीआर तर या आठवड्यातील पाच दिवसांत 280 सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहित 22, 23 आणि 24 जूनला सरकारने मंजूर केलेल्या फाईल्स आणि प्रस्तावांचा तपशील राज्यपालांनी मागवला आहे.