Shivajirao Adhalarao : राष्ट्रवादीचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांना, आढळराव पाटलांचा अजित पवारांवर निशाणा
सर्वात जास्त राष्ट्रवादीचा फटका हा पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांना बसला असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं.
Shivajirao Adhalarao Patil : महाराष्ट्रात सर्वात जास्त राष्ट्रवादीचा फटका हा पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांना बसला असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं. राज्यात राजकीय भूकंप घडला आहे. अशा परिस्थितीतही पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याला 170 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तो फक्त राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांना दिला असल्याचे आढळराव म्हणाले. आता आपल्या पक्षावर संकट आलं आहे, अशा स्थितीत आपण सर्वांनी शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे असं आवाहन आढळराव पाटील यांनी केलं.
शिवसेनेवर संकट आलं आहे, यामध्ये मी सगळ्यांच्या पुढे राहणार असल्याचे आढळराव पाटील म्हणाले. गेल्या तीन दिवसापासून 150 च्या पुढे जीआर पालकमंत्री अजित पवारांनी काढले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासरदारांना त्यांनी मोठा निधी दिला असल्याचे आढळराव पाटील म्हणाले. आम्ही किती सहन करायचे, याचाही विचार होणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले.
आपल्याला कोणी गुवाहाटीला बोलवत नाही : सचिन अहीर
सध्या आपल्याला कोणी गुवाहाटीला बोलवत नाही. कारण त्यांना गरजच नाही.,असं वक्तव्य शिवसेनेचे विधानपरिषदेतील नवनिर्वाचित आमदार सचिन अहिर यांनी केलं आहे. हे वक्तव्य करताना त्यांचा सूर हा मिश्किलतेचा होता. मात्र सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत असणारी व्यक्ती उद्या त्यांच्या गटात असेलच का? याची खात्री कोणी देत नाही. म्हणूनच सचिन अहिरांच्या या वक्तव्याला घेऊन तर्क-वितर्क् लढवले जात आहेत. पुण्याच्या चाकणमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. तेव्हा अहिरांनी फोन नॉट रिचेबल झाला तर काय होऊ शकत, हे सांगताना आपल्याला गुवाहाटीला कोण बोलवत नाही, असं मिश्किल वक्तव्य केलं.
शरद सोनवणे आणि शिवाजी आढळराव पाटील जे बोलले ते घडत होतं. त्या बाबी मी उद्धव ठाकरेंच्या कानावर टाकल्या आहेत. त्यातून काही प्रश्न आपण सोडवले आहेत. हे कट कारस्थान चालत राहते. परंतू आपण कधी कोणाला संपवण्याची भाषा करत नाही. पुणे जिल्ह्यासाठी काय लाभ मिळाला हा प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारला, तर त्याचं उत्तर प्रत्येकाला माहितच आहे. त्यामुळं आपल्याला सत्तेची पर्वा नाही. मात्र आपल्याला संपवण्याची भाषा कोण करत असेल तर त्याला रोखल्याशिवाय राहणार नाही, असेही अहीर यावेळी म्हणाले.