Shivsena Vs Ekanath Shinde : बंडाळीविरोधात शिवसेना आक्रमक ; मुंबईसह राज्यभरात तीव्र निदर्शने होणार
Shivsena Vs Ekanath Shinde : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसैनिक आक्रमक होणार असून मुंबईसह राज्यात निदर्शने करणार आहे.
Shivsena Vs Ekanath Shinde : शिवसेनेतील आतापर्यंत सर्वात मोठी बंडाळी झाल्यानंतर शिवसेना आता आक्रमक पवित्रा घेणार आहे. या बंडाळीविरोधात आणि भाजपविरोधात शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेना भवनाबाहेर आज संध्याकाळी शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
मागील काही वर्षात शिवसेनेतून काही नेते बाहेर पडले होते. विद्यमान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष सोडल्यानंतर आतापर्यंतचे हे मोठे बंड आहे. सध्या असलेल्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे निम्म्याहून अधिक आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत शिवसेनेचे 15 आमदार सहभागी झाले होते. शिवसेना आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार आता शिवसैनिक आक्रमक होणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे आणि इतर फुटलेल्या आमदारांच्या विरोधात मुंबईत शिवसेना आक्रमक होणार आहे. मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.
बंडानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास 20 तासानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही असे शिंदे यांनी म्हटले.
शिवसेनेत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर बंड झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटनंतर आता अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत. एकनाथ शिंदे आता आनंद दिघे यांच्या नावाने स्वत:ची संघटना स्थापन करू शकतात. त्यातून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देऊ शकतात. एकनाथ शिंदे यांनी ट्वीटनुसार त्यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली असून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार चालवण्यास अनुत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, बंड करुन सुरतमध्ये गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेने कारवाई करत त्यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. त्या ठिकाणी आता शिवडी मतदारसंघाच्या अजय चौधरी यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर तडकाफडकी कारवाई करत हा निर्णय घेतला आहे. अजय चौधरी हे शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. 2019 मध्ये विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी 40 हजार मताधिक्क्याने विजयी झाले होते.