Diela : अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
Diela First AI Minister : सरकारी टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला पूर्णविराम देण्यासाठी अल्बानियामध्ये एआय मंत्री नेमण्याचा नवा प्रयोग करण्यात आला आहे.

Diela First AI Minister Albania : जगभरात एआयचा बोलबाला सुरू असताना त्यातून आता राजकारण आणि धोरणकर्तेही सुटणार नाहीत. जगात प्रथमच एखाद्या देशाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्री नेमण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अल्बानियामध्ये एआय मंत्री म्हणून नियुक्त झालेल्या डिएला (DIELA) हिने नुकतेच संसदेतील आपले पहिला भाषण दिले. या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष अल्बानियाकडे वेधले आहे.
AI Minister Diela Parliament Speech : डिएलाचे संसदेतले भाषण
आपल्या पहिल्या भाषणात डिएलाने स्पष्ट केले की, विरोधक तिच्या नियुक्तीला सतत असंवैधानिक ठरवत आहेत आणि त्यांच्यावर आक्षेप घेत आहेत. मात्र, ती फक्त मनुष्याच्या मदतीसाठी आहे, मनुष्याची जागा घेण्यासाठी नाही. संविधानाला धोका मशीनमुळे नसून सत्तेत बसलेल्या लोकांच्या अमानवीय निर्णयांमुळे आहे, असे डिएलाने म्हटलं.
डिएलाने आश्वासन दिले की पारदर्शकता, जबाबदारी आणि निष्पक्षता या मूल्यांचे पालन ती तितक्याच काटेकोरपणे करेल जितके मनुष्य करतात.
Who Is Diela : कोण आहे डिएला?
‘डिएला’ या नावाचा अल्बानियन भाषेत अर्थ “सूर्य” असा आहे. त्या नावानेच या नवीन एआय महिला मंत्र्याला ओळखले जाईल. डिएलाचा चेहरा आणि आवाज हा अल्बानियाची सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिला बिशा हिच्यावर आधारित आहे.
आपल्या पहिल्याच संसदीय कामाच्या दिवशी आणि पहिल्याच भाषणाच्या दिवशी डिएला ही पारंपरिक अल्बानियन पोशाखात दिसली.
Albania AI Minister : एआय मंत्री नेमण्यामागील कारण
अल्बानियाचे पंतप्रधान एदी रामा (Edi Rama) यांनी 12 सप्टेंबर रोजी डिएलाची नियुक्ती सार्वजनिक खरेदी मंत्रालयात (Public Procurement Ministry) एआय मंत्री म्हणून केली. अल्बानिया युरोपियन युनियनमध्ये (EU) सामील होण्याच्या प्रक्रियेत आहे, मात्र त्या देशात सुरू असलेला भ्रष्टाचार ही सर्वात मोठी अडचण ठरत आहे.
सरकारी टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला पूर्णविराम देण्यासाठी हा नवा प्रयोग करण्यात आला आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, सार्वजनिक निधीच्या वापरात 100 टक्के पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी डिएलाकडे असेल.
जगात पहिल्यांदाच एआय मंत्री नेमण्याचा अल्बानियाचा निर्णय भविष्यातील राजकारण आणि प्रशासनासाठी आदर्श ठरू शकतो. यामुळे अल्बानिया डिजिटल गव्हर्नन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात एक नवा अध्याय लिहित आहे.
ही बातमी वाचा:
- Chabahar Port : 'माय फ्रेंड मोदी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा टॅरिफनंतर भारताला मोठा झटका, छाबाहार बंदरासाठी दिलेल्या निर्बंधावरील सूट रद्द























