वाचाळ गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांनी अनुल्लेखानं मारलं; खासदार विशाल पाटील म्हणाले, या व्यक्तीला मोकळीक कोणी दिली, त्याच्या मागे कोण हे पाहिलं पाहिजे
जयंत पाटील सांगलीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांना पडळकर टीकेबाबत विचारणा झाली असता यावेळी मी काही बोलणार नाही, जे काय चाललंय ते तुम्हीच बघा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Jayant patil and Vishal Patil on Gopichand Padalkar: महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर गरळ ओकत सुटलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. गोपीचंद पडळकर यांची जीभ राष्ट्रवादीच्या नेत्यांविषयी बोलताना सातत्याने घसरतच गेली आहे. त्यांनी आता हद्दच केली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेनंतर राज्याच्या राजकारणातून चौफेर टीका होत आहे. सोशल मीडियामधूनही गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला जात आहे.
जयंत पाटील यांनी अनुल्लेखानं मारलं
दरम्यान, जयंत पाटील यांना गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेविषयी विचारला असता, जयंत पाटील यांनी अनुल्लेखानं मारलं. जयंत पाटील सांगलीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांना पडळकर टीकेबाबत विचारणा झाली असता यावेळी मी काही बोलणार नाही, जे काय चाललंय ते तुम्हीच बघा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या विषयावर बोलणं टाळत जयंत पाटील निघून गेले.
कोणी मोकळीक दिली हे पाहिलं पाहिजे
मात्र, सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी मात्र गोपीचंद पडळकर यांचा बोलवता धनी कोण? कोणी मोकळीक दिली हे पाहिलं पाहिजे असं म्हणत तोफ डागली आहे. विशाल पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्यावरूनही पडळकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याच्या विकासामध्ये वसंतदादा पाटील यांचं काय योगदान आहे याचं सर्टीफिकेट गोपीचंद पडळकर यांच्याकडून घेण्याची गरज नसल्याचं विशाल पाटील यांनी म्हटलं आहे. विशाल पाटील म्हणाले की जिल्ह्यातील काही लोकांकडून जी वक्तव्य होत आहे त्यामागे कोण आहे, या व्यक्तीला फूस कोण देतं हे पाहिलं पाहिजे असं ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राचे राजकारणामध्येही पडळकर यांच्या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सुनावलं आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पडळकर यांची कानउघडणी केली आहे. मात्र, इतकं होऊनही पडळकरांची मग्रुरी कमी झालेली नाही. माफी मागण्याचा कोणताच प्रश्न नसल्याचे म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























