Nashik Crime : वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
Nashik Crime : नाशिकच्या पंचवटी परिसरात बुधवारी पहाटे राहुल वाडी येथील सागर जाधव या इसमावर गोळीबार करण्यात आला होता.

Nashik Crime : नाशिकच्या पंचवटीतील (Panchavati) राहुलवाडी (Rahulwadi) परिसरात बुधवारी पहाटे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात मोठा खळबळ उडाली आहे. जुना वाद आणि वर्चस्वाची झुंज या पार्श्वभूमीवर सागर जाधव या युवकावर थेट गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकरणात तब्बल 11 संशयित आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
पूर्ववैमनस्यातून सागर जाधववर गोळीबार
राहुलवाडी, फुलेनगरजवळ राहणाऱ्या सागर विठ्ठल जाधव या युवकावर बुधवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. यामध्ये एक गोळी डाव्या गालातून घुसून मानेत अडकली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. सागर जाधव याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकरणी योगेश माधव वाघमारे (28, रा. समाजमंदिराशेजारी, राहुलवाडी) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, आरोपी विकी विनोद वाघ व विकी उत्तम वाघ हे दोघे घटनास्थळी आले आणि विकी वाघ याने कमरेतील पिस्तुलमधून सागरवर गोळीबार केला.
टोळीयुद्धाची पार्श्वभूमी; 11 आरोपी अटकेत
पोलिस तपासात समोर आले की, हा हल्ला टोळीयुद्ध व जुन्या वादातून घडला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी पंचवटी, भद्रकाली आणि गुंडाविरोधी पथकांची विशेष मोहीम राबवून, फुलेनगर परिसरातून 11 संशयित आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फरार आरोपींचा शोध सुरू
गोळीबारात वापरलेली पिस्तुल आणि इतर कटात सामील असलेल्या व्यक्तींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. यातील दोन आरोपी अजूनही फरार असून, त्यांच्यासाठी विशेष शोधपथक रवाना करण्यात आले आहेत. पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सर्व अटकेतील आरोपींना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या























