Laxman Hake : इंग्रजी शिकून रिझर्वेशनचे स्पेलिंग लिहून दाखवा, दिल्ली नव्हे, अमेरिका-अफ्रिकन देशात जावं; लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान
Laxman Hake : जरांगे पाटील यांनी दिल्ली नाही तर अमेरिका अथवा आफ्रिकन कंट्रीमध्ये जावं. तिथे जाऊन आरक्षणाचं ज्ञान पाजळावं, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

बीड: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या आज बीडच्या केज आणि गेवराई दोन ठिकाणी महाएल्गार सभा होत आहेत. दरम्यान लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर कडाडून टीका केली. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या भूमीतून ओबीसींचे आरक्षण संपविले. त्याच भूमीत महाएल्गार सभा होत आहेत. तर खासदार बजरंग सोनवणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं हाके (Laxman Hake) यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून ओबीसींच्या मनात भ्रम निर्माण करून गाफील ठेवण्याचा प्रयत्न असून तुम्हाला काय भांडायचे ते भांडा आम्हाला अंडरस्टिमेट करू नका असं हाके म्हणत आहेत.
जरांगे पाटील यांनी दिल्ली नाही तर अमेरिका अथवा आफ्रिकन कंट्रीमध्ये जावं. तिथे जाऊन आरक्षणाचं ज्ञान पाजळावं. तसेच जरांगे पाटील यांनी इंग्रजी शिकून रिझर्वेशनच स्पेलिंग शिकावं असं चॅलेंज हाके यांनी दिले. इथल्या लोकांनी कारखानदारांनी जरांगे पाटील यांना गुळाचा गणपती केला. दिल्लीत जाऊन तुमची अगरबत्ती कुठे लावणार? असा सवाल हाके यांनी उपस्थित केला.
माझ्यासाठी अकराशे जणांची टीम तयार करा. त्यांना मी प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. अकरा जणांची टीम केली तरी लक्ष्मण हाके घरी बसणार नाही. तर मराठा समाजापुढे ठेवलेल्या लग्नाच्या प्रस्तावावरून हाके यांनी यू टर्न घेत मी तसे काही बोललो नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. आम्ही टीट फॉर टॅटची भाषा बोलत आहोत. दोन वर्ष संविधानाची भाषा बोललो आता मात्र आमचा विद्रोह आहे. तर दसऱ्यानंतर मुंबईला जाणार असल्याचं हाके यांनी सांगितले आहे.
लग्नाच्या प्रस्तावावरून हाके काय म्हणालेले?
आठवडाभरापूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्यासमोर ओबीसी समाजातील (OBC) तरुणांच्या लग्नाचा जाहीर सभेतून प्रस्ताव मांडला आहे. तुम्ही मागास झालात ना? तर आता जरांगेंना माझं सांगणं आहे. कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आला आहात. तर आम्ही आमच्यातील क्वालिफाईड पोरं सुचवतो. आता पहिले 11 विवाह आप आपल्यामध्ये ठरवूयात, तुम्ही आमच्यात आले आहात. आता जात पात राहिली का? पाटील, 96 कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले का? त्यामुळे 11 विवाह जाहीर करू. असे थेट आवाहन करत लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा जाहीर सभेतून प्रस्ताव दिला होता.11 विवाहासाठी आमच्याकडे 11 मुलं असल्याचे देखील हाके यांनी बीडच्या गेवराई येथील शिंगारवाडी येथे आयोजित ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या जाहीर सभेत म्हटले होते. त्यावर आता त्यांनी यू टर्न घेत मी तसे काही बोललो नाही असंही म्हटलं आहे.
























