Maharashtra Political Crisis : भुमरे-अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून उद्या शक्तिप्रदर्शन
कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून उद्या पैठण आणि सिल्लोड मतदारसंघात रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत शिवसेनेचे 35 पेक्षा अधिक आमदार सोबत नेले आहे. त्यांच्या या बंडानंतर राज्यात शिवसैनिक बंडखोरांच्या विरोधात रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे. मात्र आता दुसरीकडे बंडखोर आमदारांच्या समर्थनात त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहे. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून उद्या पैठण आणि सिल्लोड मतदारसंघात रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. यावेळी मतदार संघातील कार्यकर्त्यांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांचे समर्थकांकडून केले जात आहे.
सिल्लोडमध्ये भव्य रॅलीचे आयोजन
सत्तार यांच्या समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी 10 वाजता सिल्लोड येथील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय ते प्रियदर्शनी चौक अशी रॅली मार्गस्थ होणार असून प्रियदर्शनी चौक येथे रॅलीचे सभेत रूपांतर होवून सभे नंतर रॅलीचा समारोप होणार आहे. सत्तार यांच्या समर्थनात आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा म्हणून ही रॅली काढण्यात येणार आहे.
पैठणमध्ये भूमरेंच्या समर्थनात शिवसैनिक जमणार
सिल्लोड प्रमाणेच पैठणमध्ये सुद्धा उद्या सकाळी दहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवसैनिकांना एकत्र येण्याचे आवाहन भुमरे समर्थकांकडून करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या भूमरे यांच्या समर्थनात आणि शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 'हा वाघ एकटा नाही,आम्ही येतोय तुम्ही पण या,' असे भावनिक आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या औरंगाबादमध्ये बंडखोर आमदारांच्या समर्थनात निघणाऱ्या रॅलीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
- शिंदे गटाची नवी चाल, उपाध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव आता अपक्ष आमदारांकडून सादर; शिंदे सेनेला फायदा होणार?
- Eknath Shinde : विकिपीडियावर एकनाथ शिंदेंच्या नावाचा डंका; बायडेन, पुतीन,मोदींनाही टाकले मागे
- Maharashtra Political Crisis: 'मी सुशिक्षित गुंड आहे, पोस्ट फडणाऱ्यांना सोडणार नाही', बंडखोर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचा इशारा