Coronavirus Update | राज्यात गेल्या 24 तासात 51 पोलिसांना कोरोनाची लागण
राज्यात एकूण 1809 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 194 पोलीस अधिकारी आहेत आणि 1615 पोलीस कर्मचारी आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 18 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. कोरोनाच्या विळख्यातून 'खाकी'ही सुटलेली नाही. गेल्या 24 तासात 51 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या 1809 वर पोहोचली आहे.
या 1809 पोलिसांमध्ये 194 पोलीस अधिकारी आहेत आणि 1615 पोलीस कर्मचारी आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 18 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 678 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 50 हजार पार
राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजार पार पोहोचला आहे. तर आज एकाच दिवशी तीन हजारांहून अधिक रुग्ण राज्यात आढळले आहेत. राज्यात काल 3041 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. अशारीतीने राज्याचा कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे.
दिवसभरात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 1635 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1196 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 14 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या राज्यात 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.