परभणीच्या अंकिता मानेचं भन्नाट यश, घरी राहून अभ्यास करत मिळवला आयआयटीत प्रवेश
कोणत्याही कोचिंगमध्ये अॅडमिशन न घेता, ना कोणत्या मोठ्या शहरात क्लास लावला, घरच्या घरीच योग्य पद्धतीने अभ्यास करून तिने आयआयटीत प्रवेश मिळवला आहे.
परभणी : घरात आठरा विश्व दारिद्र्य, पोटाची खळगी भरण्यासाठी बांगड्यांच्या व्यवसायातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांतून उदरनिर्वाह चालवणाऱ्या माने कुटुंबातील एका मुलीने याच बांगड्यांच्या काचांमधून स्वतःची चमक सिद्ध केली आहे. कुठल्याही मोठ्या शहरात क्लास न लावता घरीच आपल्या जिद्दीने थेट आयआयटीत अभियांत्रिकी पदवी मिळवण्याचं स्वप्न परभणीच्या अंकिता माने हिने पूर्ण केलं आहे. नुकत्याच झालेल्या जेईई अॅडव्हांस या परीक्षेत तिने देशात 793वा रँक मिळवलाय.
परभणी शहरातील अर्जुनराव माने यांना 2 मुली. त्यांचा व्यवसायही फार मोठा नाही, कारेगाव रस्त्यावर बांगड्यांचे दुकान. जेमतेम अशी आर्थिक परिस्थिती. त्यामुळे कुटुंबातील दोन मुली या अत्यंत हुशार असताना सुध्दा इतरांप्रमाणे ते मुलींना कोटा किंवा अन्य महानगरांकडे शिकावयास पाठवू शकले नाहीत. परंतु माने कुटुंबातील अंकिता हीने अगदी जिद्दीने आणि योग्य अशा मार्गदर्शनाच्या बळावरच आयआयटी इंजिनिअरिंगचं आपल्या स्वप्नपूर्तीचा संकल्प सोडला. परभणी सारख्या ठिकाणीच राहून, योग्य पध्दतीने अभ्यास करत यशसुध्दा पटकावलं. नुकताच जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर झाला. त्यात अंकिता हिने 793 रँक पटकावला. अन् ती आयआयटी इंजिनिअरिंगसाठी पात्र ठरली. तेव्हा अंकितासह माने कुटुंबियांचा आनंद अक्षरशः गगनात मावेनासा झाला होता. या आनंदवार्तेने तिच्या आई-वडीलाच्या डोळ्यातून आनंदाश्रूच आले.
अंकिता ही कृषी सारथी कॉलनीतील गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी. तेथूनच ती इयत्ता दहावी उत्तीर्ण झाली. त्याचवेळी तिने इंजिनिअर करून आई-वडीलांना मदत करायची असाच निर्धार केला होता. त्यासाठी तीने बारावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पाठोपाठ अभ्यासात सातत्य राखलं, दिवसातून नऊ ते दहा तास अभ्यास केला. अभ्यासाचे योग्य नियोजन केले. त्यामुळेच अंकिता आपल्या स्वप्नपूर्तीचा संकल्प पूर्ण करू शकली.
आयआयटीमधून इंजिनिअरिंग करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. ते स्वप्न आज पूर्ण झाले. असे स्पष्ट करीत आयआयटीमध्ये इंजिअरिंग पूर्ण केल्यानंतर युपीएससी परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे आपले स्वप्न आहे, असे ती म्हणाली शिवाय अंकिताने इयत्ता बारावीत गणितात 100 पैकी 100 गुण पटकावले. त्याचवेळी तिची चुणूक दिसून आली. तिने अभ्यासाचे नियोजन करतांनाच अंगी जिद्द, योग्य मार्गदर्शन असेल तर कोटा, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी न जाताही येथे राहूनसुध्दा निकाल येतो असा आत्मविश्वास अंकिता ने बोलुन दाखवलाय.