पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य? किरीट सोमय्यांना पुण्यात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाची केंद्राकडून दखल
पुण्यात किरीट सोमय्यांना शिवसैनिकांकडून झालेल्या मारहाणीप्रकरणी पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य असा वाद पेटण्याची शक्यता आहे.
पुणे : पुणे पालिकेच्या प्रवेशद्वारावर किरीट सोमय्यांना शिवसैनिकांकडून झालेल्या मारहाणीची दखल आता केंद्राकडून घेण्यात आली आहे. सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयएसएफ अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत. सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी आज यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तर हे अधिकारी केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर करणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवरुन केंद्र विरुद्ध राज्य असा वाद पेटणार आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांना शनिवारी पुणे महानगरपालिका मारहाण झाली. जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची माहिती घेण्यासाठी ते पुणे महानगरपालिकेत आले होते. परंतु महापालिका आयुक्तांना भेटण्यापूर्वीच शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केली होती. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कलमं न लावल्याचा आरोप करीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र निघून घटनाक्रम कळवला होता. त्यानंतर आता या प्रकरणात दिल्लीने लक्ष घातले आहे.
किरीट सोमय्या यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती घेण्यासाठी दिल्लीतून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) अधिकारी पुण्यात दाखल झाले . या अधिकाऱ्यांनी आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली त्यामुळे किरीट सोमय्या त्यांच्यावर पुढे महानगरपालिकेत झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्लीनेही लक्ष घातले आहे.
दरम्यान पुण्याच्या महापौरांनी त्यांच्याच ताब्यात असलेल्या महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेला यासाठी जबाबदार धरुन पुणे महापालिका आयुक्तांनी याबाबत खुलासा करण्याची मागणी पत्र लिहून केली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना लिहलेल्या पत्रात किरीट सोमय्या ज्यावेळेस महापालिकेत येणार होते तेव्हा सुट्टी असूनही शिवसेनेचे कार्यकर्ते महापालिकेच्या इमारतीत कसे पोहचले असा प्रश्न उपस्थित केला आ. त्याचबरोबर सोमय्यांच्या सुरक्षेची आवश्यक ती काळजी का घेतली नाही असही महापौरांनी आयुक्तांना विचारलं असून याबाबत लेखी खुलासा करण्याची मागणी केलीय.
इतर महत्त्वाच्या बातम्या :