Corona Lockdown | राज्याच्या महसुलात विक्रमी घट; अशी आहे तिजोरीची स्थिती
मार्च 2019 मध्ये राज्याच्या तिजोरीत 42 हजार कोटी रुपयाचा महसूल जमा झाला होता. मार्च 2020 मध्ये केवळ 17 हजार कोटी महसूल मिळाला, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात 60 टक्क्यांची घट झाली.
मुंबई : लॉकडाऊनमुळे सध्या राज्यातील उद्योग, व्यापार आणि आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. वस्तू आणि सेवा कर, मुद्रांक शुल्क, अबकारी कर, परिवहन करासह इतर करातून मिळणारा पूर्ण महसूल बंद झाला आहे. राज्याला आतापर्यंत अंदाजे 40 हजार कोटी रुपयांचा महसुली तोटा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मार्च 2019 मध्ये राज्याच्या तिजोरीत 42 हजार कोटी रुपयाचा महसूल जमा झाला होता. मार्च 2020 मध्ये केवळ 17 हजार कोटी महसूल मिळाला, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात 60 टक्क्यांची घट झाली. एप्रिल 2019 मध्ये राज्याचे महसुली उत्पन्न 21 हजार कोटी रुपये इतके होते, यावर्षी त्यात 70 टक्क्यांहून अधिक घट होण्याचा अंदाज आहे. सप्टेबर-ऑक्टोबर 2019 च्या जीएसटी परताव्यापोटी राज्याला केवळ 1800 कोटी रुपये मिळाले. आणखी 5 हजार कोटी अपेक्षित आहेत. सध्या राज्यावर 5 लाख 20 हजार कोटी रुपये एवढं भलंमोठं कर्ज आहे. व्याजापोटी आपल्याला महिन्याला 3 हजार कोटी भरावे लागतात
मद्यविक्री आणि राज्य सरकारची तिजोरी
गेल्या वर्षी (2019-20) राज्य सरकारला मद्यविक्रीतून 25 हजार 323 कोटी रुपयाचा महसूल मिळाला होता. 2018-2019 या वर्षात 15 हजार 323 कोटी रुपयांचा महसूल मिळाला, त्यात एका वर्षात 10 हजार कोटीची भर पडली होती. मुंबईपाठोपाठ पुणे शहर आणि जिल्ह्यातून मद्यविक्रीच्या माध्यमातून सर्वात जास्त महसूल मिळतो. पुणे जिल्ह्यातून वर्षाला तब्बल 2 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. महिन्याला पुण्यातून 167 ते 175 कोटी रुपये एकट्या पुणे शहर आणि जिल्ह्यातून मिळतो, तो या महिन्यात बुडालाआहे.
लॉकडाऊनच्या काळात दारुचोरीचे घडलेले गुन्हे
- नाशिकमध्ये पॅरोलवर सुटलेल्या दोघांनी राज्य उत्पादन शुल्कचं गोदाम फोडून 3 हजार बाटल्या लांबवल्या
- नागपूर जिल्ह्यात सलग तीन दिवसात 3 बार आणि दारुची दुकानं फोडून 26 हजाराची देशी दारु चोरीला
- मुंबईतील वडाळ्यात एका वाईन शॉपमध्ये शिरून अडीच लाख रुपयांहून अधिक किंमतीच्या 182 दारूच्या बाटल्या चोरल्या
- मालवणी येथे गावठी दारू विक्रीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असून, गावठी दारूचा साठा जप्त केला आहे.
- पुण्यातील कात्रज परिसरांत अत्यावश्यक सेवेच्या दूध वाहतुकीचे लेबल लावून गावठी दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. त्यात गावठी दारूचे 36 मोकळे आणि 1 भरलेला असे एकूण ३७ कॅन सापडले
- 24 मार्च ते 11 एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात 2 हजार 383 गुन्हे नोंदविण्यात आले असून 937 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 115 वाहने जप्त करण्यात आली असून 5 कोटी 71 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.