दुर्दैवी! नाशिकमध्ये सहाजण धरणात बुडाले तर बीडमध्ये खदानीत बुडून तिघांचा मृत्यू
राज्यात आज दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. एक घटना नाशिकमध्ये घडलीय तर दुसरी घटना बीडमध्ये घडली आहे.
नाशिक/बीड : राज्यात आज दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील नाशिक जिल्ह्यात सहाजण धरणात बुडाले तर बीडमध्ये खदानीत बुडून तिघांचा जीव गेला आहे. या घटनांमुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
पहिल्या घटनेत नाशिक जिल्ह्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 6 जणांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तरुण-तरुणींचा समावेश आहे. येथील वालदेवी धरणावर 9 जण वाढदिवस साजरा करायला गेले होते. यापैकी 5 मुली आणि 1 मुलगा बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. धरणाजवळ सेल्फी काढण्याच्या नादात तोल गेल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.
पोहण्यासाठी गेलेल्या खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू
दुसरी घटना बीड शहरपासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारात सांयकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस दाखल झाले असून घटनेची अधिक माहिती घेत आहेत. बीड तालुक्यातील पांगरबावडी शिवारातील बायपासनगरी येथील खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू झाला. सदरील तरुण हे बीड शहरातील गांधी नगर येथील आहेत. पोहण्यासाठी खदाणीत गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा मृतदेहाचा शोध सुरु आहे.