(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News : बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्काराचं वादळ; परीक्षांसाठीचं साहित्य बोर्डाकडून घेण्यास नकार
Maharashtra News : आम्ही आमच्या शाळा आणि शाळेतील कर्मचारी प्रात्यक्षिक परीक्षांसाठी उपलब्ध करून देणार नाही असे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस म्हणाले.
Maharashtra News : राज्यात लवकरच बारावीच्या (HSC Exam) प्रात्यक्षिक परीक्षांना (Practical Exams) सुरुवात होणार आहे. मात्र, त्या आधीच प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्काराचा वादळ घोंगावत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार घालत या परीक्षांसाठीचं साहित्य बोर्डाकडून घेण्यास आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सहकार्य करण्यास नकार दिला आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, थकीत वेतनेत्तर अनुदान आणि इतर शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे बोर्डाकडून लक्ष दिलं जात नाहीये. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने बहिष्काराचे हे हत्यार उचललं आहे. आम्ही आमच्या शाळा आणि शाळेतील कर्मचारी प्रात्यक्षिक परीक्षांसाठी उपलब्ध करून देणार नाही असे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे सध्या तरी प्रात्यक्षिक परीक्षा धोक्यात आल्याचे वक्तव्य त्यांनी केलं आहे. शासनाने लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून जर आमच्या महामंडळाची बैठक लावून लेखी आश्वासन दिले, तर यावर तोडगा निघू शकेल असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान आमच्या कृतीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येत असलं तरी आमचा नाइलाज झाल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
काय आहेत शिक्षण संस्थाचालकांच्या मागण्या?
1. राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. 2012 पासून अजून पर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया झालेली नाही. ही भरती प्रक्रिया ताबडतोब करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
2. महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे (2004 ते 2013 पर्यंतचे) वेतनेत्तर अनुदान थकीत द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
3. प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोधही या मागण्यांमध्ये करण्यात आला आहे.
4. नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदीं बाबत माहिती देण्यात यावी असं महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
अशा मागण्या शिक्षण संस्थाचालकांनी केल्या आहेत.
बारावीच्या लेखी परीक्षा कधीपासून होणार आहेत?
बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहेत. तर, दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :