Nashik Tomato Price : सफरचंद, पेट्रोल मागे पडलं, 'अब की बार' टोमॅटो पोहोचले प्रतिकिलो 'दीडशे पार', नाशिकमध्ये आजचा दर काय?
Nashik Tomato Price : आजमितीला नाशिकच्या (Nashik) बाजारात टोमॅटोसाठी तब्बल 160 रुपये मोजावे लागत आहेत.
Nashik Tomato Price : राज्यातील सत्ताकारण जोरात (Maharashtra Politics) सुरू असतानाच सामान्य माणूस मात्र महागाईच्या आगीत होरपळून निघतो आहे. तीन आठवड्यांपासून टोमॅटोचे (Tomato Price) भावाने महागाईचा शिखर गाठल आहे. आजमितीला नाशिकच्या (Nashik) बाजारात टोमॅटोसाठी तब्बल 160 रुपये मोजावे लागत आहेत. तर कोथिंबीर जुडीसाठी थोडेथोडके नव्हे तर चांगले 40 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून काही शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रासह विविध राज्यात सुरू असलेल्या पावसाचा फटका टोमॅटोसह इतर भाज्यांना बसला आहे. राज्यासह देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून पाच आणि दहा रुपये किलोने मिळणारे टोमॅटो आज जवळपास 150 ते 160 रुपये किलो दराने मिळत आहेत. त्याचबरोबर इतरही भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली असून ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांत सुरू असलेल्या पावसाचा टोमॅटोसह (Nashik Tomato Rate) इतर भाज्यांना फटका बसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, टोमॅटोसह भाजीपाला सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असून घरचं बजेट कोलमडून गेलं आहे. पण या वाढीव दराचा फायदा खरंच शेतकऱ्यांना होतोय का? हाच खरा प्रश्न आहे.
यंदाच्या चालू वर्षी टोमॅटो उत्पादन घेणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात टोमॅटो लागवड केल्याने कृषी उत्पन्न बाजार (Nashik Bajar Samiti) समितीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली होती. त्यामुळे टोमॅटोला उठाव नसल्याकारणाने प्रति किलोला दीड ते दोन रुपये भाव मिळत होते. प्रतिकिलोला एक दीड रुपया बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकला होता. तर काही भागातील शेतकऱ्यांनी शेतात जनावरे सोडली होती. अनेक ठिकाणी दराबाबत आंदोलने देखील करण्यात अली होती. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने टोमॅटो बाजार चांगलेच तेजीत आले आहेत. नाशिक बाजार समितीत लिलाव प्रक्रियेत टोमॅटो प्रति किलो 120 रुपयांपासून ते 160 रुपये दराने विक्री होत आहे. तब्बल दीड ते दोन महिन्यानंतर टोमॅटो मालाला वर्षातील सर्वाधिक उच्चांकी बाजार मिळाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
टोमॅटो दरवाढीचा फायदा कुणाला?
टोमॅटो उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही दिवसांपूर्वी भाव पूर्ण कोसळले होते. लागवड आणि दळणवळण खर्च निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो जनावरांना सोडला होता. ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड करत पीक जपले त्या शेतकऱ्यांना टोमॅटो मालाने प्रतिकिलोला दीडशे रुपये बाजारभाव मिळवून दिला आहे. सद्यस्थितीत ज्या शेतकऱ्यांचा माल बाजारात येत आहे, त्यांनी शेडनेट किंवा पॉली हाऊस मध्ये टोमॅटोचे उत्पादन घेतले असून उन्हाळी टोमॅटोची लागवड केल्याचे दिसून आहे. कारण साधारणतः नाशिक जिल्ह्यातील बहुतांश टोमॅटो उत्पादक शेतकरी दिवाळीकडे टोमॅटो उत्पादन घेत असतो, अशा भर पावसात टोमॅटो उत्पादन घेणे अवघड होऊन बसते. मात्र शेडनेट किंवा पॉली हाऊस सारखी व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांना हे शक्य असल्याचे दिसते. त्यामुळे फारच कमी शेतकऱ्यांना टोमॅटो दरवाढीचा फायदा झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिकला आजचा बाजारभाव काय?
दरम्यान, सद्यस्थितीत नाशिकमध्ये किरकोळ बाजारात टोमॅटो 140 ते 160 रूपये किलो दराने मिळत आहेत. तर आले 400 किलो, लिंबू 100-120 किलो, कोथिंबीर 40 रुपये जुडी, लसूण 120-150, हिरवी मिरची 130-150 प्रति किलो दराने किरकोळ बाजारात मिळत आहेत. बटाटा आणि कांदा वगळता जवळपास सर्वच भाज्यांचे दर वाढले असून वांग्याव्यतिरिक्त कोणतीही भाजी 80 रुपये किलोपेक्षा कमी नसल्याचे चित्र आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :