(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ramdas Athawale : रिपाई आठवले गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार? रामदास आठवले यांचे महत्त्वाचं वक्तव्य
Ramdas Athawale : रिपाई आठवले गट आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष एकत्र येण्याबाबत मंत्री रामदास आठवले यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
Ramdas Athawale : गेल्या अनेक दिवसांपासून रिपाई गट (RPI) एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. तसं होताना दिसत नाही. मात्र प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि माझा गट एकत्र आल्यास फरक पडेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी व्यक्त केला आहे. पण प्रकाश आंबेडकर काही ऐकण्याचा मनस्थितीत नसल्याचे देखील आठवले यांनी बोलून दाखविले आहे. त्यामुळे आगामी काळात रिपाई आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याच्या केवळ चर्चा राहणार असल्याचे चित्र आहे.
आज मंत्री रामदास आठवले हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून दुपारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आठवले म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून रिपाई गट एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. तसं होताना दिसत नाही. मात्र प्रकाश आंबेडकर आणि माझा गट एकत्र आल्यास फरक पडेल, पण प्रकाश आंबेडकर काही ऐकण्याचा मनस्थितीत नाहीत. तसेच प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस (Congress) सोबत जातील, असे मला वाटत नाही. पण त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी, असेही आठवले म्हणाले. तसेच संविधान बदलण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे, यावर ते म्हणाले की, 'मी सर्वांना ठासून सांगतो की, संविधान बदलणे सोपे काम नाही. एकीकडे आज भारत देश ज्या संविधानावर संविधानाच्या माध्यमातून सर्वांना अधिकार देण्यात आले आहे. तरी देखील आमच्यावर अत्याचार होतो, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
तसेच समान नागरी कायद्याबाबत चर्चा सुरु आहे. यावर आठवले म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांची भूमिका होती, की देशात नागरिक समान असावे. मुस्लिम समाजाने या कायद्याबाबत गैरसमज करू नये. या कायद्याला माझा पाठिंबा आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य होण्यासाठी हा कायदा व्हावा, अशी आशा आठवले यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांनी कवितेतून सुरवात केली. ते म्हणाले की, 'आमची चांगली झाली आहे शिक्षा, म्हणूनच आम्ही नेहमी करत असतो प्रतिक्षा', आम्हालाच लवकरच मंत्री पद मिळावे. केंद्रीय मंत्रीमंडळात माझे प्रमोशन होईल की नाही, हे मोदी ठरवतील..माझ्या पक्षाचा खासदार नसल्याने मला वाटत नाही की, मला कॅबिनेट मिळेल..व मला जर कॅबिनेट मिळाले, तर नक्कीच भाजपला फायदा होईल.महाराष्ट्रात आम्हाला लोकसभेला दोन जागा मिळाव्या.मी शिर्डीत लढण्यासाठी इच्छुक असल्याचे ते म्हणाले.
दलित पँथरला 50 वर्ष पूर्ण
दलित पँथरला 50 वर्ष पूर्ण असून पँथरला दलित, समाजकारणाचा इतिहास आहे. आमच्याशी मैत्री करा, या भावनेतून पँथरची निर्मिती झाली. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी ही चळवळ गावागावांत नेण्याचे काम केले. शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. मराठवाड्यात विद्यापीठ व्हावे, ही आंबेडकर यांची भूमिका होती. भूमीहीन लोकांना जमीन देण्याचा निर्णय सुधाकर नाईक यांच्या काळात झाला. त्यावेळी दलित अत्याचार दूर करण्याचे प्रयत्न पँथरने केले. मात्र 1990 साली नाईलाजाने पँथर बरखास्त करावी लागली. अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली की, दलित पँथर पुन्हा सुरू करावी. याबाबत अनेक लोकांशी बोलत आहे. त्याचे पुन्हा स्वरूप कसे असावे, याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगत रामदास आठवले यांनी दलित पँथरच्या आठवणी ताज्या केल्या.