(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Ramdas Athwale : छगन भुजबळांनी राष्ट्रवादी सोडून रिपब्लिकन पक्षात यावं, मंत्री रामदास आठवले यांची ऑफर
Nashik Ramdas Athwale : छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडावे आणि रिपब्लिकन पक्षात यावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
Nashik Ramdas Athwale : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची रास्त भूमिका असून जास्तीत जास्त पदाधिकारी मराठा समाजातील आहेत, भुजबळ नेहमीच शरद पवार यांच्या मागे ताकदीने उभे राहिले. त्यांना जर वाटत असेल की, अन्याय होत आहे, तर छगन भुजबळ यांनी बाहेर पडावे आणि रिपब्लिकन पक्षात यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी छगन भुजबळ यांना केले आहे. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्याची मागणी केली होती.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे आज नाशिक (Nashik) शहरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दलित पँथरला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुवर्ण महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या सुवर्ण महोत्सवाचे आयोजन येत्या 10 जुलै रोजी नाशिकमध्ये होईल. नाशिक शहरातील कालिदास कलामंदिरात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक लोकांचे मत आहे की, दलित पँथर संघटन पुन्हा सुरू व्हावे. याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान नुकतीच पाटणा (Patana) येथे विरोधकांची बैठक पार पडली. याबाबत आठवले म्हणाले की, विरोधक पक्षांना शुभेच्छा असून त्यांनी एकत्र यावे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्त येथे भेट दिली. त्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे मुस्लिम विरोधी नाही, अशी भावना तयार झाली आहे. पीएम नरेंद्र मोदी जगातील एक नंबरचे पॉप्युलर नेते आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही कांगावा केला, तरी NDA चे सरकार येईल.2024 मध्ये आम्ही 350 पेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारी करत आहेत. भाजपने देखील मित्र पक्षाशी बोलणी सुरु असून बैठका देखील पार पडत आहेत. यावर आठवले म्हणाले की, मित्रपक्षाला सोबत घेऊन भाजपा जात आहे. NDA च्या प्रत्येक मीटिंगला आम्ही जातो. मात्र महाराष्ट्रात अशा मीटिंग होत नाही. भाजप पक्षाची भूमिका समजून घेतली पाहिजे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला जागा मिळावी, मित्र पक्षाला जागा मिळावी, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त करत स्थानिक पातळीवर भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी बोलवलं पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले. इगतपुरी परिसरात दोन दिवसांपूर्वी घटना घडली. यावर आठवले म्हणाले की मला वाटतं की, याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिलेले आहे. आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणात गोमांस होते का, याची तपासणी करावी. याबाबत फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
खायचं असल्यास तेलंगणात जाऊन खावं...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र बीआरएस पक्षाचा बोलबाला असून आज पक्षाचे मंत्रिमंडळ थेट विठ्ठल दरबारी दर्शन घेऊन आले. आठवले म्हणाले की, तेलंगणा मध्ये BJP आणि TDP एकत्र येऊन केसीआर यांची सत्ता घालवण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या पक्षाने महाराष्ट्रात फारसा फरक पडणार नाही. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आहे. त्यांना सुद्धा दर्शनाला यायचा अधिकार आहे. मात्र तिथले पावित्र्य राखले जावे, असे आवाहन आहे. मात्र नॉनव्हेज देणे अत्यंत चुकीचे असून पंढरीचा अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे. खायचे असेल तर त्यांनी तेलंगणामध्ये जाऊन खावं. एकादशीच्या दिवशी नॉन व्हेज खाणे, अशा प्रकारे हा अपमान असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे बीआरएस हा पक्ष भाजपची बी टीम असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आठवले म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे. तो त्यांचा स्वतंत्र पक्ष असून त्यामुळे बी टीम आहे, असं म्हणता येणार नाही, असे ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेब कबरीवर भेट दिली. यावर आठवले म्हणाले की, त्या ठिकाणी जाणे अयोग्य आहे. आंबेडकरी चळवळ मुस्लिमांना पाठिंबा देणारी आहे, औरंगजेब याला पाठींबा देणारी नाही. मुस्लिम समाजाला आवाहन आहे की, आमचं सरकार आपल्यासाठी देखील कामे करत आहे. नागरिकांचे संरक्षण करणे, आमची जबाबदारी आहे. त्यांनी मुस्लिम समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, त्याला आमचा विरोध आहे. त्याचबरोबर राज्यात कुठेही दंगली झाल्या नाही. हिंदू-मुस्लिम समाजाचा दंगा कुठेही झाला नाही. केवळ पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात वाद झाला.त्यामुळे ते म्हणतात की, दंगा थांबला, पण दंगा झालाच नव्हता, असे स्पष्टीकरण रामदास आठवेल यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानंतर दिले आहे.