Rahul Kalate Pimpri Election: राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
Rahul Kalate Pimpri Election: महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राहुल कलाटे यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर असंतोष उफाळून आला आहे.

Rahul Kalate Pune news: पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल कलाटे यांचा काल भाजपमध्ये प्रवेश होणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपच्या इच्छुकांनी कलाटे (Rahul Kalate) यांना तीव्र विरोध केला अन त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राहुल कलाटे यांना भाजपमध्ये (BJP) घेतल्यास आम्ही वेगळी भूमिका घेऊ, असा इशारा या इच्छुकांनी दिला आहे. कलाटेंचा प्रवेश झाला तर ते प्रभाग 25 मधून निवडणूक लढणार हे उघड आहे. त्यामुळे भाजपमधील इच्छूक उमेदवार प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. याशिवाय भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगतापांच्या (Shankar Jagtap) विरोधात लढलेल्या कलाटे यांचा प्रचार आम्ही कसा काय करायचा?, असा सवाल या नाराजांनी उपस्थित केला आहे. भाजपचे वरिष्ठ आमच्यावर अन्याय होऊ देणार नाहीत. असं झालं तर आम्ही त्यावेळी वेगळी भूमिका घेऊ, असा निर्वाणीचा इशारा भाजपमधील इच्छूक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे. त्यामुळे आता भाजपचे वरिष्ठ नेते राहुल कलाटे यांच्या पक्षप्रवेशाबाबत काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. (Pimpri Chinchwad Election news)
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Election: स्थानिक आमदार अन शहराध्यक्षांचा विरोध डावलून राहुल कलाटेंचा पक्षप्रवेश होणार
पिंपरी चिंचवड विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लवकरच धक्का बसणार असल्याची चर्चा कालपासून रंगली आहे. राहुल कलाटे हे कोणत्याही क्षणी तुतारीची साथ सोडून हाती कमळ घेणार आहेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे चिंचवडमधील आमदार शंकर जगतपांच्या विरोधात कलाटे यांनी 2024ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे शंकर जगतापांसह शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा या प्रवेशाला तीव्र विरोध केला आहे. राहुल कलाटे मात्र भाजप पक्षप्रवेशाविषयी सकारात्मक असल्याचे दिसून आले. राहुल कलाटे यांनी आपण एक-दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे काल सांगितले होते. मात्र, ते भाजप, शिवसेना की अजितदादा गट यापैकी कोणत्या पक्षात जाणार, हे हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.
Vasai Virar Mahanagarpalika: बविआला रोखण्यासाठी वसई विरारमध्ये भाजप योगी आदित्यनाथ यांना मैदानात उतरवणार
बविआला रोखण्यासाठी वसई विरारमध्ये भाजप योगी आदित्यनाथ यांना मैदानात उतरवणार असल्याची माहिती समोर आली आहे. वसई-विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभा पार पडणार आहेत. लवकरच भाजपकडून या सभांच्या तारखा निश्चित केल्या जातील. उत्तर भारतीय आणि हिंदू मते आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने ही रणनीती आखली आहे. योगी यांच्यासोबतच काही उत्तर भारतीय आणि भोजपुरी नेते आणि कलाकारही वसई-विरारमध्ये सभा घेतली. वसई विरार महापालिकेतली ठाकुरांची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजप संपूर्ण ताकद पणाला लावणार आहे.
आणखी वाचा
























