Nashik Anjneri Gad : नाशिकच्या अंजनेरी गडावर दरड कोसळली, पर्यटकांसाठी वाट बंद!
Nashik Anjneri Gad : नाशिक (Nashik) शहराजवळील अंजनेरी (Anjneri Fort) गडावर दरड कोसळल्याने वनखात्याने पर्यटकांसाठी रस्ता बंद केला आहे.
Nashik Anjneri Gad : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात पावसाने (Rain) उघडीप दिल्याने वातावरण आल्हाददायक झाले आहे. अशातच पर्यटनाला (Tourisam) देखील बहर आला आहे. मात्र नाशिक शहराजवळील अंजनेरी (Anjneri) हे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अंजनेरीवर जाणाऱ्या वाटेवर अचानक दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांसाठी हा रस्ता बंद करण्यात आल्याची माहिती वनखात्याने दिली आहे.
नाशिकसह त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरात पावसाळ्यात पर्यटकांची मोठी वर्दळ असते. यंदाही त्र्यंबक परिसरात अंजनेरी, पहिने, दुगारवाडी आदी परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. राज्यभरातून पर्यटक या पर्यटनस्थळावर भेटी देत असतात. तसेच शराजवळील अंजनेरी तर विशेष प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेकदा पर्यटक कुटुंबासह पर्यटनाला प्राधान्य देतात. तर अनेकदा ट्रेकर्स अंजनेरीवर ट्रेकिंगसाठी येत असतात. मात्र सद्यस्थितीत अंजनेरी गडावर जाणारी वाट बंद करण्यात आली असून पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे.
दरम्यान त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाने उघडीप दिली असली मात्र अधून मधून रिमझिप पावसाच्या सारी कोसळत आहेत. अशातच प्रसिद्ध अशा अंजनेरी गडावर जाणाऱ्या वाटेवर दरड कोसळल्याची घटना चार ते पाच दिवसांपूर्वी घडली आहे. या भागातील डोंगराच्या कड्याचा भाग हा धोकेदायक झाला असून यातीलच गुहेजवळील भागात दरड कोसळली आहे. यामुळे गडावर जाणाऱ्या वाटेवर चिखल, दगड, मातीचा खच पडला असून येथून पाय घसरून भाविक, पर्यटकांसोबत दुर्घटना घडण्याची भीती वनविभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने शक्यतो पंधरवड्यापर्यंत अंजनेरी गड भ्रमंतीला येणे टाळावे, असे आवाहन नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाने केले आहे.
पावसामुळे वाट झाली धोकादायक
दरम्यान जुलै महिन्यापासून सुरु असलेल्या प[पावसाने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काही ठिकाणी विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र त्र्यंबकेश्वर सह अंजनेरी परिसरात संततधार सुरूच आई. अशातच अंजनेरी गडावर जाणाऱ्या पायवाटेवरील भाग धोकादायक झाल्याने निखळून पडला आहे. यामुळे मोठे दगड या ठिकाणी पडले आहेत. तसेच डोंगरावरून पाण्याचा मोठा प्रवाह सातत्याने मागील तीन महिन्यांपासून वाहत असल्यामुळे येथील वाट धोकेदायक झाली आहे. त्यामुळे वनखात्याने संबंधित ठिकाणी येण्यापासून तसेच अंजेरी गडावर जाण्यापासून पर्यटकांना बंदी घातली आहे.
मजुरांकडून मलबा उचलण्याचे काम सुरु
मागील चार ते पाच दिवसांपूर्वी या ठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे पायऱ्यांवर चिखल, दगड, माती येऊन साचली आहे. त्यामुळे हा मलबा बाजूला सरण्याचे काम सध्या सुरु आहे. स्थानिक मजुरांकडून हे काम सुरु असून [पुढील सात ते आठ दिवसांत वाटेवरील हा मलबा दूर सरण्यात येईल अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. तसेच डोंगराचा भाग हा अधूनमधून सातत्याने कोसळत असल्याने पायऱ्याही निसरड्या बनल्या आहेत. त्यामुळे अंजनेरी सर करण्यासाठी येणे टाळावे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी कळविले आहे.