Sant Nivruttinath Palkhi : संत निवृत्तीनाथ पालखी दिंडी सिन्नरकडे रवाना, आज लोणारवाडीत मुक्काम, उद्या दातलीत गोल रिंगण
Nashik Trimbakeshwer : संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी पळसे येथील मुक्कामांनंतर सिन्नरकडे (Sinnar) मार्गस्थ झाली आहे.
Sant Nivruttinath Palkhi : 'हाती टाळ, मृदूंग घेत, हरिनामाचा गजर' करत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी (Sant Nivruuttinath Palkhi) पंढरपूरकडे रवाना झाली आहे. नाशिकमधून ही पालखी पुढे सिन्नरकडे (Sinnar) मार्गस्थ झाली असून शिंदे पळसे येथील मुक्कामांनंतर आज पालखी सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी परिसरात विसावणार आहे. त्यानंतर पुढे सिन्नर तालुक्यातुन दिंडीचे मार्गक्रमण होणार आहे.
संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी (Ashahdi Wari) पालखी सोहळा 2 जून रोजी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) इथून पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान करण्यात आले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील महानिर्वाणी आखाड्यात यंदा पहिल्यांदाच मुक्काम करण्यात आला. त्यानंतर 3 जून रोजी दिंडी सोहेलनाशिक शहराकडे मार्गस्थ झाला. त्या दिवशी नाशिकच्या सातपूर परिसरात दिंडीचा मुक्काम झाला. 4 जून रोजी पायी दिंडी सोहळा नाशिक शहरात दाखल झाला. मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. याचवेळी वरुणराजाने देखील हजेरी लावली. यावेळी वारकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांनतर 5 जून रोजी दिंडी पुढील मार्गासाठी मार्गस्थ झाली. त्या दिवशीचा मुक्काम हा नाशिक (Nashik) सिन्नर मार्गावरील पळसे या गावी झाला.
दरम्यान आज सकाळी पुन्हा एकदा वारकऱ्यांनी पळसे (Palse) गावातून नागरिकांची ऊर्जा घेत वारीला सुरुवात केली. खांद्यांवर भगवी पताका, हाती टाळ, मुखाने विठ्ठलनाम घेत मार्गक्रमण करणारे वारकरी तर डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मंगल कलश घेतलेल्या माताभगिनींची रस्त्याने वर्दळ पाहायला मिळाली. ठिकठिकाणी भाविकांसह वारकऱ्यांनी संत निवृत्तीनाथांसह ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत विठ्ठलमय वातावरणात स्वागत करण्यात येत आहे. मुक्कामाच्या ठिकाणी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येते. त्या दिवशी गावकऱ्यांकडून दिंडीसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. ठिकठिकाणी भाविक विसावा घेतात. संत निवृत्तीनाथांच्या पालखीला विसावा देतात. त्याचबरोबर रात्री कीर्तनाचा कार्यक्रम करत विठ्ठलनामाचा गजर केला जातो.
उद्या दातली गावात गोल रिंगण
दरम्यान आज सकाळी पळसे इथून 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम' असा गजर करत पंढरीच्या दिशेने कूच करत निघालेल्या पालखीला उपस्थित ग्रामस्थांनी मोठ्या भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. यानंतर पालखी आज सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी या गावात विसावणार आहे. आज जवळपास वीस किलोमीटरचे अंतर कापून संत निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळा सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी गावात पोहोचणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात जून रोजी संत निवृत्तीनाथ पायी दिंडी दातली गावात पोहचणार असून इथे पहिले उभे गोल रिंगण होणार आहे.