(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Onion Auction : दादा भुसेंची मध्यस्थी, लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा सुरु, दिलासा मिळणार का?
Nashik News : आजपासून पुन्हा लासलगावमध्ये कांदा लिलाव प्रक्रिया सुरु झाली असून लिलावात साडेचारशे रुपयापासून बाजार खुले झाले.
Nashik News : नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न (Onion Issue) चांगलाच पेटला असून शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्याचे कृषीमंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मध्यस्थी केली. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने आजपासून (28 फेब्रुवारी) पुन्हा लासलगाव (Lasalgaon) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव प्रक्रिया सुरु झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांदा दरावरुन शेतकरी (Farmers Protest) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज अधिवेशनाच्या (Budget Session) दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून याच मुद्द्यावर आंदोलन करण्यात आले. तर सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दुसरीकडे काल सकाळी लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येत कांदा लिलाव बंद पाडले. यामुळे दुपारी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेत कांद्याला हमीभाव देण्याचे आश्वासन दिले. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे आजपासून पुन्हा कांदा लिलाव प्रक्रिया पूर्ववत झाली आहे.
साडेचारशे रुपयापासून बाजार खुले
सोमवारी झालेल्या आंदोलनानंतर आजपासून पूर्ववत लिलाव प्रक्रिया सुरु झाली असून सुरुवातीच्या लिलावात साडेचारशे रुपयापासून बाजार खुले झाले. कमीतकमी कमी हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनानंतर परिस्थिती जैसे थे आहे. दुसरीकडे सभागृहात विरोधकांनी कांद्याला हमीभाव देण्याबाबत मागणीला जोर लावला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाफेडने कांदा खरेदी सुरु केली असल्याचे ते म्हणाले. ज्या भागात अद्याप कांदा खरेदी सुरु झाली नाही, त्या ठिकाणी लवकरात लवकर कांदा खरेदी सुरु होईल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
एकूणच कांदा म्हटलं की नाशिकचं नाव सर्वासमोर येत. जिल्ह्यातील लासलगाव ही कांदा उत्पादकांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने कांद्याचे दर घसरत आहेत. साधारण एक ते दोन रुपये भाव कांद्याला मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. लागवडीचा खर्च देखील सुटेनास झाला असून अशा स्थितीत शेतकरी आक्रमक होऊन राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत. लासलगावमध्ये काल झालेल्या आंदोलनानंतर हा मुद्दा विधीमंडळातही गाजला. यावर आता लासलगावमध्ये पालकमंत्री भुसे यांनी मध्यस्थी केली. त्यांनतर आजपासून कांदा लिलाव प्रक्रिया सुरु झाली. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नाफेडने कांदा खरेदी सुरु केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.
नाशिकच्या आमदारांमध्ये कांद्यावरुन खडाजंगी
एकीकडे नाशिकचा कांदा सर्वदूर जात असताना सद्यस्थितीत निर्यात बंदी असल्याने मागणी घातल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. याच मुद्द्यावरून आज सभागृहात नाशिकच्या दोन आमदारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. चांदवड भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर आणि छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाल्याचे दिसून आले. सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर सुरुवातीला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कांद्याचा मुद्दा प्रकर्षाने घेण्याची मागणी केली. यानंतर छगन भुजबळ यांनी कांदा प्रश्नी सरकारला धारेवर धरले. दुसरीकडे आमदार राहुल आहेर यांनी बोलण्यास सुरुवात केल्यानंतर भुजबळ यांनी आहेर यांना थांबवत रोष व्यक्त केला.