Nashik News : खबरदार! नाशिक शहरात अनाधिकृत वृक्षतोड कराल तर... चार जणांविरुद्ध गुन्हे
Nashik News : नाशिक शहरातील सातपूर परिसरात अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Nashik News : नाशिक (Nashik) शहरात आजही हजारो लाखोंच्या संख्येने वृक्ष पाहायला मिळतात. मात्र अनेकदा शहर विकासाच्या नावाखाली किंवा इमारती बांधण्यासाठी सर्रास वृक्षतोड केली जाते. मात्र आता नाशिक मनपाने याबाबत कंबर कसली असून धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील सातपूर परिसरात अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक शहर परिसरात वृक्षांची कत्तल (tree Cutting) होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी नाशिक मनपाने (Nashik NMC) दंडाची तरतूद केली होती. त्यानंतर आता नाशिक मनपाने संबंधितांविरुद्ध कठोर पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. नाशिक शहरातील अनाधिकृत वृक्षतोडबाबत नाशिक महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. सातपूर विभागातील आनंदवली शिवार अंतर्गत श्री गुरुजी हॉस्पीटल मागे असलेल्या निर्मल कॉलनी परिसरात काशिद आणि गुलमोहर अशी दोन झाडे विनापरवानगी तोडल्याने चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात चार प्लॉटधारकांविरुद्ध गंगापूर पोलीस स्टेशन (Gangapur Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सातपूर (Satpur) उदयान विभागाचे उद्यान निरीक्षक भविष्या निकम, जगदिश लोखंडे, आर. बी. सोनवणे, हेडमाळी श्रीकांत इरणक यांनी प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी केली. त्यानंतर प्लॉटधारक महेश मिरजी यांना अनाधिकृत वृक्षतोड केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे पथक वृक्षतोडीच्या घटनांकडे लक्ष ठेवत आहे. ही मोहीम आता आणखी कडक केली जाणार असल्याचे मनपाने प्रशासनाने सांगितले आहे. मनपाच्या पश्चिम उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाकडूनही मागील महिन्यात विभागातील वेगवेगळ्या आठ ठिकाणी अनाधिकृत वृक्षतोडी बाबत आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे महापालिका उद्यान विभाग अॅक्शन मोडवर असून विनापरवानगी वृक्ष तोडल्यास कायद्यानुसार त्यांच्यावर दंडाची कारवाई होऊन गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
नाशिक मनपाकडून आवाहन
तसेच आतापर्यंतच्या कारवाईत नाशिक मनपा पथकाने साडेसात लाखांचा दंड आकारला आहे. सातपूर विभागातही त्र्यंबक रोड भंदूरे मळा येथे झालेल्या वृक्षतोड प्रकरणी पाच लाख पाच हजार रुपये दंड भरून घेण्यात आलेला आहे. शहरातील नागरीकांनी वृक्ष छाटणी आणि वृक्ष तोडण्याकरता मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून रितसर परवानगी घेऊनच पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा महानगरपालिकेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मनपा उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले.