Nashik : नाशिक मनपा आयुक्त शिवसेना शिंदे गटाचं काम करताय का? ठाकरे गटाचा सवाल, आयुक्त म्हणाले..
Nashik NMC : नाशिक मनपा आयुक्त शिंदे गटाचे कामे करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
Nashik NMC : नाशिक महापालिका (Nashik NMC) आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे फक्त शिंदे गटाचे कामे करत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच विकास कामे करताना आयुक्तांकडून एकाच गटाला झुकते माप देत असल्याचा देखील आक्षेप घेण्यात आला असून, या संदर्भात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.
सहा महिने होऊनही अद्याप शिंदे ठाकरे गटात (Thackeray Sena) दुही संपलेली नाही. कोणत्या ना कोणत्या कारणातून दोन्ही गटाकडून एकमेकांना डिवचले जात असल्याचे वारंवार दिसून येत आहे. नाशिकमध्ये (Nashik) या दोन्ही गटाच्या वेगवगेळ्या चुली पेटल्या असल्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. दुसरीकडे आज ठाकरे गटाने नाशिक महापालिका आयुक्त शिंदे गटाचे (Shivsena) कामे करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका क्षेत्रात हस्तक्षेप करत असल्याचा देखील या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला. यात काही आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याची देखील शंका व्यक्त करण्यात आली असून, याबाबत देखील महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (sudhakar Badgujar) यांनी दिली.
दरम्यान महापालिका आयुक्तांना शासन दरबारहून काही मॅसेज आले आहेत का? अशी आमच्या मनात शंका होती. फक्त शिंदे गटाचे कामकाज करायचे आणि ठाकरे गटाला प्राधान्य देऊ नये, असे काही मेसेज शासनाकडून आले आहे का? प्रथम आम्ही ती चौकशी केली. त्यावर आयुक्तांनी असे काही आदेश नसल्याचे सांगितले. सर्वसमावेशक भूमिका एक आयुक्त म्हणून ते घेणार आहे, असे त्यांनी सूचित केले आहे. असे यावेळी ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. महापालिका आयुक्त फक्त शिंदे गटाचीच कामे करत असल्याचा आक्षेप ठाकरे गटाने घेतला आहे.
नाशिक मनपाची प्रतिमा मलीन होऊ नये...
नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात जी स्वायत्त संस्था आहे. सक्षम प्राधिकरण असताना सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिका क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक झालेले आहे त्यांच कार्यक्षेत्र ठरलेले असताना ते कार्पोरेशन क्षेत्रात काम करायला का इच्छुक झाले, हा संशोधनाचा विषय आहे. त्यात काही आर्थिक देवाणघेवाण होत आहे का ही आमच्या मनात शंका आहे. जे लोकप्रतिनिधी पत्र देत असतील, त्यांना माझी विनंती आहे, की नाशिक महापालिकेची प्रतिमा मलीन होऊ नये. त्यामुळे सक्षम प्राधिकरण विभाग असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम करून घेण्याचा आग्रह का ही शंका आहे. असे काही असेल तर आमचा त्यांना विरोध आहे. तसे आम्ही आयुक्तांना सांगितले आहे, अशी देखील माहिती ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे.