(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut On Politics : महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार, लवकरच शिंदेसह 16 आमदार अपात्र ठरतील, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut On Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) 16 आमदार अपात्र ठरतील, तसेच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार : संजय राऊत
Sanjay Raut : आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडले आहे. ते अपेक्षित होते. मात्र हे सरकार अस्थिर असून लवकरच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. त्याचबरोबर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) 16 आमदार अपात्र ठरतील, असं भाकित खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त करत महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या भूकंपावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राज्याच्या राजकारणातील मोठा भूकंप घडला आहे. राष्ट्रवादीतुन (NCP) एक गट बाहेर पडला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत 30 आमदार असून त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर राजकारणातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावरुन महाराष्ट्रातील राजकारण किती भयानक झाल्याचे यावरुन दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भूमिका व्यक्त केली आहे. हे सरकार अस्थिर असून एकनाथ शिंदेसह 16 आमदार लवकरच अपात्र म्हणून घोषित होतील, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी राऊत म्हणाले की, "हे सरकार अस्थिर असून भाजपच्या म्हणण्यानुसार 165 आमदारांचा पाठिंबा असणारे सरकार लवकरच अस्थिर होईल. आजच्या शपथविधीप्रमाणे अजित पवार यांच्यासोबत 30 आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी आमचं शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी देखील बोलणे झाले आहे." अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाकी असून लवकरच एकनाथ शिंदेसह 16 आमदार अपात्र ठरतील, असा दावा संजय राऊत यांनी करत यापुढे केंद्रीय तपास यंत्रणांचा आता काय तपास होईल, त्यात मला पडायचं नसल्याचे ते म्हणाले.
'महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार'
ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे फार काळ मंत्रिपदावर राहणार नाहीत. लवकरच शिंदेसह 16 आमदार अपात्र ठरतील. शिवाय हा काही राजकीय भूकंप नाही, एकीकडे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एक इंजिन लावून आता तीन इंजिनाचा सरकार स्थापन झालं आहे. मात्र आता एक इंजिन लावल्याने दुसरं इंजिन आपोआप बाहेर पडणार आहे. त्यामुळे या सरकारला लोकांचा अजिबात पाठिंबा नाही. भविष्यात आम्ही सगळे एकत्र राहू, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करु असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. एकीकडे शिंदे गटाचा मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवा होता, मात्र घडले भलतेच. शिंदे गटातील लोकांचे चेहरे पाहिलेत का? त्यांची वेदना लक्षात आली असल्याचे राऊत म्हणाले. काही दिवसांपूर्वी जे सामनातून बोललो होतो, ते खरे ठरले आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार असून हे माझं भाकित नसून परफेक्शन असल्याचे राऊत म्हणाले.