Nashik News : नाशिकमध्ये आदिवासी नृत्यावर राज्यपालांनी धरला ठेका, मंत्री गावितांसह झिरवाळही थिरकले!
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) आदिवासी दिनाच्या (tribal Day) कार्यक्रमात राज्यपालांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला.
Nashik News : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) नेहमीच चर्चेत असतात. आज नाशिकमध्ये (Nashik) आदिवासी दिनाच्या (tribal Day) कार्यक्रमात त्यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला. त्याचबरोबर उपस्थित मंत्री विजयकुमार गावित आणि आपल्या आदिवासी शैलीसाठी नावाजलेले राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना देखील मोह आवरला नाही. त्यांनी देखील राज्यपालांसोबत आदिवासी नृत्यावर ताल धरला.
निमित्त होते क्रांतिसूर्य बिरसा मुंडा (Krantisurya Birsa Munda) यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाशिक शहरातील ईदगाह मैदानावर आयोजित आदिवासी जनजातीय गौरव दिनाचे. आज देशभरात क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चार दिवशीय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, मंत्री विजयकुमार गावित, आमदार नरहरी झिरवाळ, मंत्री डॉ. भारती पवार आदींची उपस्थिती आहे. या कार्यक्रमादरम्यान राजभरातुन कलापथक दाखल झाले असून विविध कला सादर केल्या जात आहेत.
दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलापथकांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्यात सहभागी होत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आदिवासी संगीताच्या तालावर ठेका धरला. यावेळी मंत्री विजयकुमार गावित, आमदार नरहरी झिरवाळ हे देखील नृत्यात सहभागी झाले. या कार्यक्रमात होळी नृत्य, लग्नातील पारंपरिक आदिवासी नृत्य, ढोल नृत्य, पारंपरिक आदिवासी नृत्याद्वारे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. यावेळी राज्यपालांनी राज्यभरातून आलेल्या कलापथकांचे कौतुक केले.
असे आहेत कार्यक्रम
देशभरातील आदिवासी समुदायांच्या कला संस्कृतीचे तसेच स्वातंत्र्यलढा व राष्ट्र निर्मितीमधील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचे स्मरण व त्यांचा गौरव करण्यासाठी आदिवासी जनजातीय दिवस व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दि.15 ते 18 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत गोल्फ क्लब मैदान, नाशिक येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात आदिवासी हस्तकला प्रदर्शन व विक्री सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत, पारंपरिक नृत्य स्पर्धा सायंकाळी 5.30 ते 8.30 वाजेपर्यंत, 17 व 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8.30 वाजता लघुपट महोत्सव होणार आहे. तसेच या महोत्सवात आदिवासी बांधवांच्या हस्तकलांचे साधारण 210 स्टॉल लावण्यात येणार असून अंदाजे 42 नृत्यपथके या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
मुख्यमंत्री थोड्याच वेळात कार्यक्रमस्थळी
दरम्यान आदिवासी जनजातीय गौरव दिनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे देखील थोड्याच वेळात उपस्थिती दर्शविणार आहेत. राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रम व तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवाचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड व पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.