Nashik News : सावधान! नाशिक शहरात फळं पिकलीत पण कार्बाईडने, अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा इशारा
Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील काही फळ विक्रेते केमिकलचा वापर करुन फळे पिकवीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
![Nashik News : सावधान! नाशिक शहरात फळं पिकलीत पण कार्बाईडने, अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा इशारा maharashtra news nashik news Fruits are grown in Nashik city but with carbide, appeal of Food and Drug Administration Nashik News : सावधान! नाशिक शहरात फळं पिकलीत पण कार्बाईडने, अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/17/48096d2adf4cd7a06cc1dd7ef1ecfad41679030755144441_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील काही फळ विक्रेते कॅल्शियम कार्बाइडचा (Calcium carbide) वापर करुन कृत्रिमरित्या कच्ची फळे पिकवीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा फळ विक्रेत्यांविरोधात (Fruits Sellers) अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक सुरु केली आहे. फळे विक्रेत्यांनी फळे पिकवण्यासाठी प्रतिबंधित द्रव्याचा आणि अथवा निर्धारित द्रव्यांचा अयोग्य वापर करु नये अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्याने बाजारात विविध फळे उपलब्ध झाली असून अनेक ठिकाणी ज्युसेसची दुकानेही सुरु झाली आहेत. मात्र फळे पिकण्याअगोदरच बाजारात आणली जात असून त्यावर केमिकलचा वापर करुन पिकवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनकडून महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. कार्बाईडचा वापर करुन पिकवलेल्या केळी आणि आंब्यांमुळे (Mango) आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. बाजारातील तेजीचा लाभ उठवण्यास व्यापाऱ्यांकडून हा मार्ग अवलंबला जातो. यावर निर्बंध आणण्यासाठी आणि अशा फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
एकीकडे फळे पिकणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून ज्यायोगे ग्राहकांना फळे ही खाण्यायोग्य, स्वादिष्ट, रुचकर आणि पौष्टिक उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे कृत्रिमरीत्या फळे पिकवणे ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये फळे सुनियंत्रित आणि कृत्रिमरीत्या पिकवली जातात. जेणेकरुन ते ग्राहकांना स्वीकार्य होतील त्याशिवाय त्या फळांचे आयुष्यमान वाढवले जाते. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी आंब्यासारख्या फळांची वाहतूक करणे सुलभ होते, जे पिकल्यानंतर मऊ आणि नाशवंत होतात. हे नुकसान टाळण्यासाठी फळे कच्च्या स्थितीत दूरच्या ठिकाणी नेले जातात आणि विक्रीपूर्वी गंतव्य बाजारपेठेत कृत्रिमरित्या पिकवली जात असल्याचे आढळून आले आहे.
अशा फळांमुळे आजारांना आमंत्रण....
आर्सेनिक आणि फॉस्फरस या घटकांच्या अंशामुळे अशी फळे मानवी आरोग्यास धोकादायक ठरतात. त्यामुळे चक्कर येणे, वारंवार तहान लागणे, चिडचिड होणे, अशक्तपणा, गिळण्यास त्रास होणे, उलट्या आणि त्वचेवर व्रण येतात, इत्यादीमुळे अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण यांनी अन्नसुरक्षा व मानके प्रतिबंध आणि विक्रीवरील निर्बंध नियमन 2011 चे उपनियम 2.3.5 नुसार कृत्रिमरीत्या फळे पिकवण्यासाठी मसाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर प्रतिबंध केला आहे. कॅल्शियम कार्बाइडमधून उत्सर्जित होणारा अॅसिटायलीन वायू हा फळे हाताळणाऱ्यांना सुद्धा घातक ठरु शकतो. तसेच त्यामधून उत्सर्जित होणारे आर्सेनिक आणि फॉस्फरस यांचे अंश फळाच्या प्रत्यक्ष संपर्कात येतात. म्हणून या रासायनिक प्रक्रियेने फळे पिकवण्यास प्रतिबंध केला आहे.
कारवाई करण्यात येईल....
कॅल्शियम कार्बाइड (मसाला) अथवा चुकीच्या पद्धतीने फळे पिकवणारे व्यापारी निदर्शनास आल्यास ग्राहकांनी विभागाशी संपर्क साधावा. अन्नसुरक्षा आयुक्त किंवा प्रादेशिक संचालक केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या कार्यालयास याबाबतची माहिती कळवावी, असं आवाहन नाशिक अन्न औषध प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर फळे पिकवण्यासाठी प्रतिबंधितद्रव्याचा अथवा निर्धारित द्रव्याचा योग्य वापर करु नये. असे करताना आढळणाऱ्यां विरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा 2011 व नियमानुसार कारवाई केली जाईल असा इशारा सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)