(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik SSC Exam : बेस्ट ऑफ लक! नाशिकमध्ये दहावीसाठी 203 केंद्र, 91 हजार 669 विद्यार्थी प्रविष्ट
Nashik SSC Exam : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आजपासून दहावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे.
Nashik SSC Exam : बारावीच्या परीक्षेनंतर (HSC Exam) आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारपासून (2 मार्च) दहावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे. दहावीसाठी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 203 केंद्रांवर 91 हजार 669 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. आज पहिल्या दिवशी मराठी विषयाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे.
आजपासून राज्यभरात दहावीच्या (SSC Exam) परीक्षांना सुरुवात झाली असून आजपासून ते 25 मार्च यादरम्यान दहावीची लेखी परीक्षा होईल. दहावीच्या परीक्षेला नाशिक विभागात 456 परीक्षा केंद्रांवर 1 लाख 97 हजार 334 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. तर नाशिक जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला 48 हजार 775 विद्यार्थी तर 42 हजार 94 विद्यार्थिनी असे एकूण 91 हजार 669 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावर हॉलतिकीट उपलब्ध करुन देण्यात आले असून माध्यमिक शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते उपलब्ध करुन देण्याच्या सूचना मंडळातर्फे करण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातही परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या असून परीक्षा केंद्राला लागून असलेले झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवेशद्वारावर ओळखपत्र तपासूनच विद्यार्थ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल. परीक्षा केंद्रात व्हिडीओ चित्रीकरण केले. दहावीच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर नेताना जीपीएस ट्रॅकिंग केले जाणार आहे. प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करताना त्याचे चित्रीकरण होईल. केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत परीक्षा केंद्रांवर बंदोबस्त ठेवला जाणार आहे. भरारी पथके-बैठी पथके परीक्षा केंद्रावर असतील. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या आधी अर्धा तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
विभागात एकूण 1 लाख 59 हजार परीक्षार्थी
नाशिक विभागात (Nashik Division) 1 लाख 59 हजार विद्यार्थी प्रविष्ट होतील. दहावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय मंडळातर्फे आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. कृती आराखड्याद्वारे यंदा परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्यात 4 अशा एकूण 16 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून त्याद्वारे परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घातला जाईल.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
मंडळाच्या अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवण्या, आलेख, नकाशे, लॉग टेबल, अनधिकृतपणे मिळवणे आणि वापर केल्यास पुढील एका परीक्षेस प्रतिबंध करण्यात येणार आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, मिळविणे, विकणे व विकत घेणे तसेच भ्रमणध्वनी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केली तर पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे.