Hingoli News: हिंगोलीकरांच्या आंदोलनाला यश, 30 जानेवारीपासून हिंगोली-मुंबई रेल्वे सुरू
Hingoli News: नांदेड-मुंबई-नांदेड मार्गे हिंगोली, वाशीम, अकोला अशी ही साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी असणार आहे.
Hingoli News: रेल्वे संघर्ष समिती आणि हिंगोलीकरांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. कारण अखेर हिंगोलीवरुन मुंबईला रेल्वे (Hingoli to Mumbai railway service) सुरू करण्याचा अंतिम निर्णय झाला आहे. प्रत्येक सोमवारी आणि मंगळवारी हिंगोलीकरांना आता रेल्वेने मुंबईला जाता येणार आहे. रेल्वे विभागाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे. नांदेड-मुंबई-नांदेड मार्गे हिंगोली, वाशीम, अकोला अशी ही साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी असणार आहे. तर याबाबत माहिती देतांना, दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेवून नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई -नांदेड मार्गे बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला या द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या 20 फेऱ्या करण्याचे ठरविले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
अशा असणार रेल्वे फेऱ्या!
- गाडी क्रमांक 07426 नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई: ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 30 जानेवारी आणि 6, 13, 20 आणि 27 फेब्रुवारी, 2023 ला दर सोमवारी रात्री 21.15 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे मंगळवारी दुपारी 01.30 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 07427 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - नांदेड : ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दिनांक 31 जानेवारी आणि 7, 14, 21 आणि 28 फेब्रुवारी, 2023 ला दर मंगळवारी दुपारी 04.40 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा मार्गे नांदेड येथे बुधवारी सकाळी 09.30 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 07428 नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई: हि विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 25 जानेवारी आणि 1, 8, 15 आणि 22 फेब्रुवारी, 2023 ला दर बुधवारी रात्री 09.15 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे गुरुवारी दुपारी 01.30 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 07429 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - नांदेड : ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दिनांक 26 जानेवारी आणि 2, 9, 16 आणि 23 फेब्रुवारी, 2023 ला दर गुरुवारी दुपारी 04.55 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा मार्गे नांदेड येथे शुक्रवारी सकाळी 09.00 वाजता पोहोचेल.दरम्यान या दोन्ही गाड्यांत वातानुकुलीत डब्बे तसेच स्लीपर क्लास चे डब्बे असतील.
अनेक दिवसांची मागणी!
हिंगोलीकरांना मुंबईला जायचं असेल तर परभणी किंवा नांदेडहून पुढील प्रवास रेल्वेने करावा लागायचा. त्यामुळे हिंगोलीहून मुंबईसाठी रेल्वे फेरी सुरू करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून रेल्वे संघर्ष समिती व्यापारी आणि त्याचबरोबर हिंगोलीकर रेल्वे प्रशासनाकडे करत होते. परंतू याची कोणतीही दखल प्रशासनाने अद्याप घेतली नव्हती. त्यामुळे हिंगोलीकरांनी 23 नोव्हेंबरला आक्रमक पवित्रा घेत रेल्वे रोको आंदोलन केले होते. विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्या या सर्व आंदोलनाला अखेर यश आले आहे.
संबंधित बातमी: