Hanuman Jayanti : हनुमान जयंतीवरुन राजकारण तापलं, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही आरतीचे आयोजन
Hanuman Jayanti : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत.
मुंबई : हनुमान जयंतीवरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती होणार आहे. शिवसेना उद्या दादरच्या गोल मंदिरात हनुमानाची आरती करणार आहे. तर राष्ट्रवादीकडूनही आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे. आधी मुंबई, नंतर ठाणे आणि आता पुण्यात येत्या शनिवारी राजगर्जना होणार आहे. दरम्यान जे पोस्टर मनसेनं बनवलं आहे त्यावर राज ठाकरे यांचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्या पुण्यातील कोथरुड भागातील दुधाने लॉन्स या ठिकाणी दिवसभर पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या आढावा बैठका होणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सकाळी दहा वाजल्यापासून दिवसभर या बैठकांना उपस्थितीत राहणार आहेत तर दुपारच्या सत्रात अजित पवार आणि सुप्रिया सुळे या देखील या बैठकांना उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर संध्याकाळी पावणे सात वाजता राष्ट्रवादीच्या पुणे शहर आघाडीकडून दुधाने लॉन्सच्या समोर असलेल्या हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त आरतीचे आणि तिथेच रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी जयंत पाटील यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आलीय आणि जयंत पाटील यांनी ती मान्य केलीय. तर उद्या संध्याकाळी सहा वाजता पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदिरात राज ठाकरेंच्या उपस्थितीत आरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आल्यानंतर लगेच राष्ट्रवादीकडून दुधाने लॉन्सच्या समोर असलेल्या हनुमान मंदिरात आरती आणि तिथेच रोजा इफ्तारचे एकत्रित आयोजन करण्यात आलंय.
तर शिवसेना उद्या दादरच्या गोल मंदिरात हनुमानाची आरती करणार आहे. आमदार सदा सरवणकर हनुमानाची आरती करणार आहे. ही महाआरती संध्याकाळी होणार आहे. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, अन्यथा देशभरात हनुमान चालिसा लावणार, या भूमिकेवर राज ठाकरे ठाम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अवघ्या चार दिवसांत राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरती होणार आहे.
मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा. आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायची नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते.