(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकऱ्यांना आता वसुलीचा शॉक! लातूर, बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील 18 हजार कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडीत
Farmer Electricity Cut: लातूर परीमंडलातील 18 हजार 667 पेक्षा अधिक कृषिपंपांचे विद्युत कनेक्शन तोडण्यात आले आहे.
Farmer Electricity Cut: आधीच अतिवृष्टीमुळे(Heavy Rain) संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना (Farmers) आता महावितरणाने जोराचा झटका दिला आहे. कारण लातूर, बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील 18 हजार कृषिपंपांची वीजपुरवठा खंडीत करण्यात आली आहे. सद्या रब्बीचा हंगामा सुरु असून, पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच महावितरणाकडून वीजबिल थकीत असल्याचे कारण देत शेतकऱ्यांची वीज खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.
लातूर परिमंडळात लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश होतो. तर लातूर परिमंडळात कृषी पंपाचे 5 हजार 800 कोटींचे वीज बिल थकीत आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील 18 हजार 667 पेक्षा अधिक कृषिपंपांचे विद्युत कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी वीज बिलाची होळी करत या कारवाईचा निषेध केला आहे.
रब्बीच्या पिकांना फटका बसणार...
अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हातून गेला आहे. त्यातच शेतमालाचे पडलेल्या भावामुळे बळीराजा चिंतेत आहे. त्यातच आता शेतकऱ्यांपुढे वीज बिलाचे संकट उभे राहिले आहे. कारण थकीत वीजबिल तत्काळ भरा अन्यथा वीज पुरवठा तोडण्यात येणार अशी भूमिका महावितरण कंपनीने घेतलीय. एवढचं नाही तर महावितरणाकडून प्रत्यक्षात कारवाईला सुरवात झाली असून, लातूर परीमंडलातील 18 हजार 667 पेक्षा अधिक कृषिपंपांचे विद्युत कनेक्शन तोडण्यात आले आहे. तर वीज बिलासाठी कृषीपंपचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आल्याने याचा थेट परिणाम शेतीच्या पाण्याला बसला आहे.
लातूरमध्ये आठ दिवसांपासून धडक मोहीम
कृषिपंपांच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने लातूर परिमंडळात आठ दिवसांपासून धडक मोहीम सुरू केली आहे. थकीत वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज थेट खंडीत करण्यात येत आहे. आतापर्यंत लातूर जिल्ह्यातील उदगीर विभागातील पाच हजार पेक्षा अधिक कृषिपंपांचे विद्युत कनेक्शन तोडण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील इतर भागात देखील अशीच कारवाई सुरु असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
- लातूर जिल्ह्यात 1 लाख 31 हजार 400 कृषिपंपधारक शेतकरी असून, एकूण थकबाकी 1 हजार 717 कोटी आहे. लातूर
- बीड जिल्ह्यात 1 लाख 78 हजार 550 कृषिपंपधारक शेतकरी असून, एकूण थकबाकी 2 हजार 185 कोटी आहे.
- उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लाख 53 हजार 440 कृषिपंपधारक शेतकरी असून, एकूण थकबाकी 18 हजार कोटी आहे.
सरकारने तोडगा काढावा
मागील काही महिन्यात शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला आहे. त्यातच पडलेल्या शेतमाल भावामुळे बळीराजा त्रस्त आहे. रब्बी हंगामाची पेरणी सुरू असून, पाण्याची आवश्यकता आहे. अशा काळात शेतकऱ्यांना वीज तोडणी सारख्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावर सरकारने तोडगा काढावा अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.