Video: कोणी चटई पकडत होतं, तर कोणी मंडपाचे पाईप धरून होतं; लग्नाच्या मुहूर्तावर पावसाची एन्ट्री
Unseasonal Rain: संभाजीनगरच्या गांधेली आणि बालानगर गावातील अशाच लग्नात उडलेल्या धावपळीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Unseasonal Rain: अवकाळी पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) शुक्रवारी अक्षरशः धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे शुक्रवारी लग्नाची (Marriage) तिथी असल्याने अनेक ठिकाणी लग्नसमारंभ आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे अवकाळी पावसासह झालेल्या वादळी वाऱ्याचं फटका लग्नसमारंभात देखील बसला आहे. अचानक सुरु झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसाने मंडपाचे होत्याचे नव्हते करून टाकले. तर जोरदार वाऱ्यामुळे मंडप उडून जात असल्याने त्याचा बचाव करण्यासाठी उपस्थितांची चांगलीच धावपळ उडाली. तर संभाजीनगरच्या गांधेली आणि बालानगर गावातील अशाच लग्नात उडलेल्या धावपळीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहिली घटना...
पहिली घटना छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असलेल्या गांधेली गावात समोर आली. गांधेलीतील तळेकर कुटुंबातील मुलीचा लाडसावंगी येथील गाडेकर यांच्या मुलासोबत शुक्रवारी लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान लग्नाची ठरलेल्या वेळेनुसार लग्नासाठी दोन्हीकडील नातेवाईक मंडळी जमली. लग्न लागण्याच्या ऐन मुहूर्तावरच अचानक अवकाळी पावसासह वादळी वारा सुरु झाला. पाहता पाहता जोरदार पावसाला सुरवात झाली आणि पाणी मंडपात गळू लागले. त्यामुळे मंडपात बसलेल्या पाहुण्यांना इतरत्र आसरा शोधावा लागला. तर पावसामुळे वऱ्हाडीची धावपळ उडाल्याची पाहून गावातील अनेकांनी घराची दारे उघडून त्यांना आश्रय दिला. विशेष म्हणजे या पावसात लग्नास बनविलेले पंचपक्वानही वाहून गेले .
दुसरी घटना:
दुसरी घटना पैठण तालुक्यातील बालानगरमधील आहे. बालानगर येथे बिडकीन गावातील सादत चौक येथील वऱ्हाड गेले होते. दरम्यान 12. 15 वाजता लग्न लागले. लागण लागल्यावर तत्काळ जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पण लग्न लागताच जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. पाहता पाऊस वाढत गेला. तसेच जोरदार वाऱ्यामुळे मंडप आणि चटाई उडून जात होती. त्यामुळे उपस्थित असलेल्या तरुणांनी मंडपचे पाईप धरून ठेवले. तर काहींनी उडून जाणाऱ्या चटया पकडून एका जागी जमा केल्या. अशात वरून जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे काही वेळातच मंडपात पाणीच पाणी झाले. तर पाऊस उघडताच अनेक वऱ्हाड्यांनी घरचा रस्ता धरला.
व्हिडिओ
Video: कोणी चटाई पकडत होतं, तर कोणी मंडपाचे पाईप धरून होतं; लग्नाच्या मुहूर्तावर पावसाची एन्ट्री#rain #ChhatrapatiSambhajinagar@abpmajhatv pic.twitter.com/32YHOzalJw
— Mosin Shaikh (@mosinKS) April 29, 2023
मोठ्याप्रमाणावर नुकसान...
शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. तर अनेक ठिकाणी घरे देखील पडली आहे. मराठवाडा विभागात गेल्या चार दिवसांत वादळी वाऱ्यासह गारपीट, अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे तब्बल 153 गावांत नुकसान झाले आहे. तसेच 8 हजार हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर वीज पडून दहा जणांचा मृत्यू झाला. 147 जनावरे, 1178 कोंबड्या दगावल्या आहे. त्याचप्रमाणे एकूण 54 घरांची पडझड झाल्याची माहिती विभागीय प्रशासनाकडून मिळाली आहे. विभागातील आठ जिल्ह्यांतील दहा सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: